Hardik Pandya : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने दमदार विजय मिळवला, पण अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जखमी झाल्याने भारतीय संघाची धाकधुक वाढली आहे. गोलंदाजी करताना जखमी झाल्याने हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात परतला नाही. मात्र, हार्दिक पांड्याची दुखापत किती गंभीर आहे? हार्दिक पंड्या भारताच्या पुढील सामन्यात खेळणार की नाही? अशी चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली.
रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या दुखापतीबद्दल म्हणाला...
रोहित शर्माच्या मते, हार्दिक पंड्याची दुखापत फारशी गंभीर नाही. मात्र, हार्दिक पांड्याशी संबंधित चित्र आज सकाळपर्यंत स्पष्ट होईल, असे सांगितले. दुखापत फारशी गंभीर नाही. बांगलादेशविरुद्ध नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला होता, पण तो फक्त 3 चेंडू टाकू शकला. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. हार्दिक पांड्याच्या ओव्हरचे उर्वरित 3 चेंडू विराट कोहलीने टाकले.
भारताची पुढील लढत बलाढ्य न्यूझीलंडविरोधात
वर्ल्डकपमध्ये गुणतालिकेत न्यूझीलंड चार विजयांसह अव्वल स्थानी आहे, तर भारत सुद्धा चार सामन्यात विजयी झाला असला, तरी दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडची धावगती भारतापेक्षा किंचित सरस आहे. त्यामुळे अव्वल दर्जाचे संघ 22 ऑक्टोबर रोजी आमनेसामने राहिले आहेत. न्यूझीलंड नेहमीच वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध सरस राहिला आहे. 2019 मध्येही वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला मात दिली होती. त्यामुळे या सामन्यात इतिहास पुसून टाकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे तो सुद्धा पुढील सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे भारताकडून हार्दिक पांड्या आणि न्यूझीलंडकून केन विल्यमसनच्या खेळण्यावर साशंकता आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या संघासाठी आधारस्तंभ आहेत.
भारताकडून बांगलादेशचा सहज पराभव
भारत-बांगलादेश सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास टीम इंडियाने बांगलादेशला सहज हरवले. भारतीय संघाला विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य होते. टीम इंडियाने 41.3 षटकात 3 विकेट गमावत 261 धावा करत सामना जिंकला. भारताकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. विराट कोहली 97 चेंडूत 103 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय शुभमन गिलने 55 चेंडूत 53 धावा केल्या. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले.
इतर महत्वाच्या बातम्या