पुणे : वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग चौथा विजय नोंदवला. पुण्यात आज (19 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात संघाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. बांगलादेशी संघही भारताचा विजय रथ रोखण्यात अपयशी ठरला. या विजयासह भारतीय संघ 8 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहे. बांगलादेशविरुद्धच्या शानदार विजयाचे नायक कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली ठरले.
क्रिकेटमध्ये विक्रमांवर विक्रम रचत असलेल्या किंग विराट कोहलीनं आज पुण्यातील मैदानात पुन्हा एकदा आपल्याला चेस मास्टर (धावांचा पाठलाग) का म्हटले जाते हे दाखवून दिलं. बांगलादेशविरुद्ध वर्ल्डकपमधील चौथ्या सामन्यात आज किंग कोहलीने दमदार नाबाद शतकी खेळी टीम इंडियाला चौथा मिळवून दिला. या विजयाचा शिल्पकार पूर्णतः विराट कोहली राहिला.
कोहलीच्या शतकासाठी धाव नाकारली
कोहली 74 धावांवर खेळत असताना भारताला विजयासाठी 26 धावा हव्या होत्या. येथून कोहलीला शतकाची चाहुल लागली होती. दुसऱ्या बाजूला असलेल्या केएल राहुलने त्यामुळे फक्त साथ देण्याचे काम केले. केएल राहुलने सिंगल धाव सुद्धा कोहलीच्या शतकासाठी नाकारली. विजयासाठी 26 धावा हव्या असताना कोहलीने 6, 1, 4, 0, 0, 6, 0, 1, 0, wd, 2, 0, 2, 0, 1, 0, 0, 6 अशा पद्धतीने धावा करत शतकाला गवसणी घातली. त्यामुळे कोहलीच्या शतकाचे श्रेय केएल राहुलला सर्वाधिक जाते. मागील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही केएल राहुलने श्रेयस अय्यरसाठी निर्धाव चेंडू सोडले होते. त्यामुळे श्रेयसची फिप्टी पूर्ण झाली होती.
बांगलादेशविरुद्ध सामना जिंकल्यानंतर केएल राहुल म्हणाला...
बांगलादेशविरुद्ध सामना जिंकल्यानंतर केएल राहुल म्हणाला की, मी विराट कोहलीला सिंगल नाकारली. तो म्हणाला की तुम्ही सिंगल्स न घेतल्यास वाईट होईल, लोकांना वाटेल की मी वैयक्तिक मैलाचा दगड गाठण्यायसाठी खेळत आहे, पण मी म्हटलं की आम्ही आरामात जिंकतोय, तू तुझं शतक पूर्ण कर.
सामन्यात 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आणि अवघ्या 41.3 षटकात 3 गडी गमावून सामना जिंकला. किंग कोहलीने 97 चेंडूत 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर शुभमन गिलने 55 चेंडूत 53 आणि रोहितने 40 चेंडूत 48 धावा केल्या. मधल्या फळीत श्रेयस अय्यरने 19 आणि केएल राहुलने 34 धावा केल्या. बांगलादेशच्या एकाही गोलंदाजाला भारतीय स्टार फलंदाजांवर दबाव टाकता आला नाही. ऑफस्पिनर मेहदी हसन मिराजने 2, तर वेगवान गोलंदाज हसन महमूदने 1 बळी घेतला.
कोहलीचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 48 वे शतक होते, तर गिलचे हे 10 वे अर्धशतक होते. गिलचे वनडे विश्वचषकातील हे पहिले अर्धशतक आहे. मात्र या स्पर्धेत रोहित आणि कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. कोहलीने या विश्वचषकात यापूर्वीच 2 अर्धशतके झळकावली आहेत.