मुंबई : जस्टिस लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर बीसीसीआयच्या नव्या निवड समितीत दोन मोठ्या बदलांची चिन्हं दिसत आहेत. माजी यष्टिरक्षक एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील या निवड समितीतून गगन खोडा आणि जतीन परांजपे या दोघांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बीसीसीआयनं शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली असून, याच सभेत खोडा आणि परांजपे यांच्या भवितव्याचा फैसला होईल.
लोढा समितीच्या शिफारशीनुसार निवड समिती सदस्यानं कसोटी क्रिकेट खेळणं अनिवार्य आहे. पण खोडा आणि परांजपे या दोघांनीही आजवरच्या कारकीर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं नाही. खोडानं दोन, तर परांजेपनं चार वन डे सामन्यांमध्येच भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्या दोघांनाही निवड समितीतून दूर केलं जाण्याची चिन्हं आहेत.
बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीत एमएसके प्रसाद यांच्यासह देवांग गांधी आणि शरणदीपसिंग यांचाही समावेश आहे.