मुंबई : रिलायन्सने जिओ 4जी सिमकार्ड घरपोच देण्याची तयारी चालवली आहे. जिओ सेवा लॉन्च केल्यानंतर रिलायन्सच्या स्टोअर्समध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या होत्या. बऱ्याच ग्राहकांना सिमकार्ड घेण्यासाठी तारेवरची कसरतही करावी लागली होती. जिओच्या सिमकार्ड खरेदीची प्रक्रिया सोपी करण्यासाठी रिलायन्सकडून सिमकार्ड घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


रिलायन्सच्या जिओ सिमकार्डला सध्या मोठी मागणी आहे. त्यामुळे जिओ सिमकार्डची ऑनलाईन विक्री करण्याचा विचार रिलायन्स करत आहे. लवकरच जिओ सिम रिलायन्सच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येईल, तसंच ते घरपोचही दिलं जाण्याची शक्यता आहे.

रिलायन्सने जिओ सिमच्या ऑनलाईन विक्रीची चाचणीही सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या शहरांमध्ये ही सेवा पुरवली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सिमकार्ड मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.

रिलायन्सने मागच्याच महिन्यात जिओ 4जी सेवा लॉन्च केली होती. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत मोफत अमर्यादित मोफत कॉल्स आणि 4जी डेटा दिला जाणार आहे.