नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी श्रीनगरच्या एका बाजारपेठेत सीमा सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करताना 21 वर्षीय तरुणी माध्यमांच्या कॅमेरात कैद झाली होती. पण मंगळवारचा दिवस तिच्यासाठी स्वप्नवतच होता. कारण मंगळवारी तिने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांची राजधानी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये भेट घेतली. यावेळी तिला जम्मू-काश्मीरच्या फुटबॉल टीमचे नेतृत्व देण्यात आले होतं.

अफ्शा आशिक असं या तरुणीचं नाव असून, ती जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला फुटबॉल टीमची कर्णधार आहे. अफ्शासह 22 जणांच्या टीमने राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीवेळी तिने राज्यातील खेळाडूंच्या समस्यांचा पाढा राजनाथ सिंहांसमोर वाचून दाखवला.



मूळची श्रीनगरची रहिवासी असलेली अफ्शा सध्या मुंबईतील एका फुटबॉल क्लबकडून खेळत आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमध्ये सीम सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करताना तिचा फोटो माध्यमांच्या कॅमेरात कैद झाला होता. या घटनेमुळे आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं असल्याचं, तिने यावेळी सांगितलं.

तसेच, आता भूतकाळ विसारायचा असून, आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असल्याची, इच्छाही तिने यावेळी व्यक्त केली. सध्या ती श्रीनगरमधील एका कॉलेजमधून बी.ए. करत आहे.

विशेष म्हणजे, बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक तिच्या जीवनावर एक सिनेमा बनवणार आहेत. पण त्यांचे नाव उघड करण्यास अश्फाने नकार दिला.

अर्धा तास झालेल्या बैठकीनंतर अश्फा आणि तिच्या टीमच्या सदस्यांनी राज्यातील खेळाडूंना मुलभूत सुविधा मिळाव्यात, अशी मागणी राजनाथ सिंहांकडे केली. यानंतर राजनाथ सिंह यांनी तात्काळ जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यास सांगितलं. शिवाय, पंतप्रधानांकडून विशेष पॅकेजद्वारे राज्याला शंभर कोटी रुपये दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

टीमचे मॅनेजर त्सेरिंग अनगोमो यांनी सांगितलं की, “सीमा भागात क्रीडा क्षेत्रासाठी बरीच मेहनत घ्यायची गरज आहे. या क्षेत्राकडे लवकरात लवकर लक्ष दिले नाही, तर इथले तरुण दहशतवाद आणि बेकायदेशीर कामं; जसे की, दगडफेकी किंवा इतर घटनांकडे वळतील. खेळांसाठी सुविधा मिळाल्यास, तरुणांच्या प्रतिभेला नवा वाव मिळेल. आणि त्यानंतर त्यांचं कोणीही ब्रेनवॉश करु शकणार नाही.”

या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्वीट करुन त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, जम्मू-काश्मीरमधील इतर तरुणांसाठी हे मोठं उदाहरण असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.