मुंबई : सध्या गुंतवणूकदारांमध्ये बिटकॉईनबाबत आकर्षण वाढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने मंगळवारी गुंतवणूकदारांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.


आरबीआयने यापूर्वीही बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असं सांगितलं होतं. त्यावरुनच पुन्हा बँकेने गुंतवणुकदरांना बिटकाईनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे .

बिटकॉइनच्या मूल्यामध्ये वाढ आणि इनिशियल कॉईनच्या ऑफर्स (ICO)मधील अधिक वाढ झाल्याने, त्यावर बँकेने यावेळी चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, गेल्या आठवड्यात एका बिटकॉईनचे मूल्य तब्बल 11 हजार डॉलर्सवर पोहोचले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. बिटकॉईनचे नियंत्रण कोणत्याही मौद्रिक प्राधिकरणाच्या माध्यमातून होत नाही.

काय आहे बिटकॉईन?

  • बिटकॉईन हे एक नवं डिजिटल चलन आहे. कॉम्प्युटर नेटवर्किंगवर अधारित व्यवहारांसाठी याची निर्मिती झाली.

  • 2009 मध्ये याचा शोध सातोशी नाकामोतो नावाच्या एका जपानी इंजिनियरने लावला.

  • बिटकॉईनसाठी खरेदी केल्यानंतर कॉप्युटर किंवा मोबाईलवर त्याचे इ वॉलेट तयार होतं.

  • या प्रणालीमध्ये एक व्यक्ती एकपेक्षा जास्त वॉलेट तयार करु शकतात.

  • याचा वापर ईमेलप्रमाणे केला जातो. पण यात फरक केवळ इतकाच आहे की, याचा पत्ता केवळ एकदाच वापरता येतो.

  • याचा वापर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करता येतो. तसेच याचं नियंत्रण कोणत्याही एका अधिकृत संस्थेकडे किंवा सरकारकडे नाही.

  • सध्या बिटकॉइनचं मूल्य भारतीय चलनानुसार तब्बल 70 हजारापेक्षा जास्त आहे.