कोलंबो : भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी रवाना झालेल्या श्रीलंकेच्या नऊ खेळाडूंना त्यांच्या क्रीडामंत्र्यांनी रोखलं. आपली परवानगी न घेताच खेळाडूंना भारतात पाठवलं जात होतं, असा दावा क्रीडामंत्री दयासिरी जयासेकेरा यांनी केला आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन डे मालिकेची सुरुवात 10 डिसेंबरपासून होत आहे. श्रीलंकेच्या कायद्यानुसार खेळाडूंना कोणत्याही देशात जाण्यापूर्वी क्रीडामंत्र्याची परवानगी घेणं गरजेचं आहे.

''निवडकर्त्यांनी 1 डिसेंबरपूर्वीच संघाची निवड करणं गरजेचं होतं. मात्र काही खेळाडूंवर निर्णय न झाल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे संघ निवडीचा तपशील पोहोचण्यास उशीर झाला'', अशी माहिती जयासेकेरा यांनी ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’शी बोलताना दिली.

''एवढ्या कमी वेळेत परवानगी कशी देता येईल? कायद्यानुसार, खेळाडूंना दुसऱ्या देशात खेळण्यासाठी पाठवायचं असेल तर किमान तीन आठवडे अगोदर यादी पाठवणं गरजेचं आहे. दुसऱ्या देशात खेळाडू पाठवण्याच्या चार ते पाच तास अगोदर यादी देण्यात आली. त्यामुळे खेळाडूंना थांबवावं लागलं'', अशी माहिती जयासेकेरा यांनी ‘डेली मिरर’शी बोलताना दिली.

''खेळाडूंविषयी काहीही तक्रार नाही. थिसारा परेराने फोन करुन सांगितलं की आम्ही विमानात बसलो आहोत. मात्र मी त्यांना असंच जाण्याची परवानगी दिली असती तर चुकीचा पायंडा पडला असता'', असंही जयासेकेरा यांनी सांगितलं.

संघात सहभागी होण्यापूर्वी सर्वांनी फिटनेस टेस्ट करावी, असा आग्रह काही दिवसांपूर्वीच जयासेकेरा यांनी केला होता. त्यानंतरच जयासेकेरा यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि वन डे संघाला मंजुरी दिली.