मॉस्को : रशियातील फिफा विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये फ्रान्सने बेल्जियमला नमवत फायनलनध्ये धडक मारली आहे. यानंतर आता फ्रान्सचे प्रशिक्षक डिडियर डेशॉ यांना अनोख्या विक्रमाची संधी आहे.


फ्रान्सने यंदा विश्वचषक जिंकला, तर एक खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये विश्वचषक जिंकणारे डेशॉ जगातील तिसरे फुटबॉलवीर ठरू शकतात. फ्रान्सनं 1998 साली डेशॉ यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वचषक पटकावला होता.


रशियातल्या विश्वचषकात फ्रान्सच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी डेशॉ यांच्यावर आहे.


याआधी जर्मनीच्या फ्रान्झ बेकेनबाऊर आणि ब्राझिलच्या मारियो झागलो यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्यानं विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला होता.


बेकेनबाऊर हे 1974 सालच्या जर्मनीच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जर्मनीनं 1990 साली विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.


मारियो झागलो यांचा ब्राझिलच्या 1958 आणि 1962 सालच्या विश्वचषक संघात समावेश होता. त्यानंतर 1970 साली त्यांनी ब्राझिलचे प्रशिक्षक या नात्यानं विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.


 दरम्यान, इंग्लड आणि क्रोएशिया या संघांमध्ये आज विश्वचषकाची दुसरी सेमीफायनल होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी 15 जुलैला फ्रान्सबरोबर फायनलमध्ये भिडणार आहे.