रशिया : थायलंडमधील चिआंग राय परिसरातल्या गुहेत अडकलेल्या बारा फुटबॉलपटूंची आणि त्यांच्या प्रशिक्षकाची गेल्या तीन दिवसांत सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव या फुटबॉलपटूंची रशियावारी रद्द झाली आहे.


दोन आठवड्यांहून अधिक काळ गुहेत अडकून राहिल्यामुळे या मुलांची प्रकृती मोठा प्रवास करण्याच्या दृष्टीने चांगली नाही. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव थायलंडच्या शालेय फुटबॉलपटूंची रशियावारी रद्द करण्यात आली आहे.

तब्बल 18-19 दिवस या मुलांनी चिकाटीनं गुहेतल्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला त्याची फुटबॉलविश्वात प्रशंसा होत आहे.

फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांनी थायलंडमधील या मुलांना रशियात सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकाची फायनल पाहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं.

दरम्यान, फिफा विश्वचषकाची फायनल गाठणाऱ्या फ्रान्सइतकंच फुटबॉलविश्वात सध्या थायलंडच्या शालेय फुटबॉलपटूंचं त्यांच्या जिद्दीसाठी कौतुक होत आहे. फ्रान्सच्या पॉल पोग्बानं तर बेल्जियमवरचा विजय थायलंडच्या शालेय फुटबॉलपटूंना समर्पित केला.

गुहेत मुलं कशी अडकली ?

थायलंडमधील एका शाळेतील 12 मुलं त्यांच्या कोचसोबत 23 जूनला टॅम लूंग ही गुहा पाहण्यासाठी गेली. परंतु गुहेत अचानक पुराचं पाणी शिरल्यामुळे ही मुलं आणि त्यांचा कोच तिथेच अडकून पडली. यानंतर नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांना त्या गुहेबाहेर खेळाचं साहित्य आणि काही सायकल्स आढळून आल्या. या कर्मचाऱ्यांनी स्थानिक फुटबॉल क्लबशी संपर्क साधल्यानंतर 12 मुलं आणि त्यांचा कोच गुहेत अडकल्याचं समोर आलं.

सुमारे दोन आठवडे चाललेल्या बचावकार्यानंतर या मुलांसह त्यांच्या कोचला गुहेतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.