मुंबई : भारताचे माजी सलामीवीर डब्ल्यू व्ही. रमण यांची महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षकपदाच्या या शर्यतीत त्यांनी रमेश पोवार, गॅरी कर्स्टन, वेंकटेश प्रसाद यांच्यावर मात केली. 53 वर्षीय रमण यांनी भारतासाठी 11 कसोटी आणि 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 1988 ते 1997 या कालावधीमध्ये ते भारतीय संघाबरोबर होते.

भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीने रमण यांची निवड केली आहे. महिला टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पत्करावी लागलेली हार आणि प्रशिक्षक रमेश पोवार-मिताली राज यांच्यात झालेला वाद यामुळे बीसीसीआयला नव्या प्रशिक्षकाचा शोध होता. त्यामुळे अर्ज मागविण्यात आले होते.

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकापर्यंत पोवार यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ संपताच नव्याने अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार 20 डिसेंबरला माजी खेळाडू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची समिती उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक 3 ते 4 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळेल.