लखनौ : भगवान हनुमान अर्थात बजरंगबली हे दलित, वंचित असल्याचे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. मात्र भगवान हनुमान हे मुस्लीम असल्याचा दावा उत्तरप्रदेशातील भाजप आमदाराने केला आहे. भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.




हनुमान हे मुस्लीम होते म्हणूनच मुसलमानांची नावे ही रहमान, रमजान, फरमान, झीशान, कुर्बान अशी ठेवली जातात. ती त्यांच्या नावावरच ठेवली जातात, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार बुक्कल नवाब यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


यापूर्वीही बुक्कल नवाब यांनी अयोध्येतील वादग्रस्त स्थळावर मशीद उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली होती. आमदार नवाब म्हणाले, माझं मत आहे की, हनुमान हे मुस्लीम होते. त्यामुळेच मुसलमानांमध्ये मुलांना जी नावे ठेवली जातात ती रहमान, रमजान, फर्मान, झीशान, कुर्बान सारखी जेवढीही नावे ठेवली जातात ती हनुमानांवरच ठेवली जातात.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राजस्थानमध्ये हुनमान हे दलित आणि वंचित होते, असे म्हटले होते.  या वक्तव्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. विरोधी पक्षच नव्हे तर भाजपाच्याच काही मंत्र्यांनी योगींवर निशाणा साधला होता.