Indian Men's Football Team Captain Sunil Chhetri Retirement: फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीतील भारत आणि कुवेत यांच्यातील सामना 0-0 असा बरोबरीत संपला. हा सामना कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळला गेला आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्या (Sunil Chhetri) कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय फुटबॉलमध्ये एक पोकळी निर्माण होईल.
शेवटचा सामना संपल्यानंतर इतर खेळाडूंनी सुनील छेत्रीचा सत्कार केला, मात्र यादरम्यान तो भावूकही झाला. पहिल्या आणि दुसऱ्या हाफमध्ये भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण एकाही संधीचा फायदा भारताला करता आला नाही. अंतिम-18 मध्ये जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. मात्र भारत अजूनही पुढच्या फेरीत जाऊ शकतो, पण इतर सामन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
सुनील छेत्रीची कारकीर्द-
सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप चांगली राहिलेली आहे. सुनील छेत्रीने त्याच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत 151 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 94 गोल केले. आजपर्यंतच्या इतिहासात भारतीय संघासाठी सर्वाधिक 4 हॅटट्रिक करणारा खेळाडू देखील सुनील होता. छेत्री हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये जगातील चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. या यादीत पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो (128), इराणचा अली दाई (108) आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (106) त्याच्यावर आहे.
16 मे रोजी केली होती निवृत्तीची घेणार असल्याची घोषणा-
16 मे रोजी एक्स (आधीचे ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर करत सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली होती. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, असं म्हणत सुनील छेत्रीने जवळपास 9 मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये सुनील छेत्रीने पदार्पणाच्या सामन्याची आठवण काढली. याशिवाय तो त्याच्या सुखी सरांबद्दल सांगताना दिसतो. खरे तर सुनील छेत्रीच्या पहिल्या सामन्यात सुखी सर प्रशिक्षक होते. सुनील छेत्री म्हणतो की, तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील भावनांचे वर्णन करू शकत नाही. त्या सामन्यात मी माझा पहिला गोल केला. विशेषत: जेव्हा मी टीम इंडियाची जर्सी घातली होती, तेव्हा एक वेगळीच अनुभूती होती, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, असं सुनील छेत्री म्हणाला.
संबंधित बातमी: