IND vs PAK SAFF Championship 2023 : सुनील छेत्रीच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने फुटबॉलच्या मैदानात पाकिस्तानला आस्मान दाखवले. बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४-० च्या फरकाने पराभव केला. सैफ चॅम्पियनशीप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होता.. या सामन्यात भारतीय कर्णधार सुनील छेत्री याने प्रभावी कामगिरी करत विजयात मोठी भूमिका पार पाडली.


दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. बेंगलोरमधील के श्री कांतीरावा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामना रंगला. सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. आज झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. 
भारतासाठी कर्णधार सुनील छेत्री या दमदार कामगिरी केली. छेत्रीने सलग तीन गोल केले. त्याशिवाय उदांता सिंह याने सामन्याच्या ८१ व्या मिनिटाला एक गोल केला.  छेत्रीने तीनमधील दोन गोल दोन गोल पेनल्टीवर केले. पाकिस्तानच्या संघाला एकही गोल करता आला नाही.


ND vs PAK: भारतीय कोचसोब पाकिस्तानचे खेळाडू भिडले -


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामना एकतर्फी झाला. संपूर्ण सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व होते. एकादाही पाकिस्तानच्या संघाला पुनरागमन करता आले नाही. सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू भारतीय कोचला भिडले. 45 व्या मिनिटाला हा प्रसंग घडला.  पाकिस्तानी खेळाडू जेव्हा थ्रो इन घेत होते, तेव्हा भारतीय कोच इगोर स्टिमॅक यांनी चेंडूला हात मारला.. त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू भारतीय कोचसोबत भिडले. त्यानंतर भारतीय खेळाडूही आले. दोन्ही संघाच्या खेळाडूमध्ये धक्काबुक्की झाली. 


थोड्यावेळानंतर हे प्रकरण शांत झाले. त्यनंतर रेफरीने भारतीय कोचला रेड कार्ड दिले. तर पाकिस्तानच्या कोचला येलो कार्ड दाखवला. तर भारतीय डिफेंडर संदेश झिंगन आणि पाकिस्तानचा मिड फील्डर राहिस नबी यांनाही येलो कार्ड दाखवले.  


सैफ चॅम्पियनशिप 2023 ग्रुप (SAFF Championship 2023)


Group A: भारत, कुवैत, नेपाळ, पाकिस्तान
Group B: लेबनान, मालदीव, भूटान, बांगलादेश 



भारतीय संघाचा दबदबा -


सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत आठवेळा जेतेपद मिळवले आहे.  1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 मध्ये टीम इंडियाने जेतेपद मिळवलेय. मालदीवने 2008 आणि 2018 मध्ये जेतेपद मिळाले. त्याशिवाय बांगलादेशने 2003 मध्ये चषकावर नाव कोरले होते.  सध्या भारतीय संघाचे फीफा रॅकिंग 101 इतके आहे. सैफ चॅम्पियनशीपमुळे भारताला फिफा रँकिंग सुधारण्याची संधी असेल. भारतीय संघाने रविवारी भुवनेश्वर येथे लेबनान संघाला 2 -0 ने पराभूत करत इंटरकांटिनेंटल चषकावर नाव कोरले होते.