Morocco vs Portugal FIFA World Cup 2022 Highlights: फीफा वर्ल्ड कपच्या तिसऱ्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात मोरक्कोने मोठा उलटफेर केला आहे. मोरक्कोने पोर्तुगालचा 1-0 ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या पराभवासह पोर्तुगालसह रोनाल्डोचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. फिफा विश्वचषकात मोरक्कनं पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.


फिफा विश्वचषकात मोरक्को संघानं इतिहास रचला आहे. उपांत्य फेरीत पोहचणारा मोरक्को पहिला आफ्रिकन संघ ठरलाय. याआधी कोणत्याही आफ्रिकन संघाला उपांत्य फेरीत धडक मारता आली नव्हती. आज अल थुमामा स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य पूर्व सामन्यात मोरक्कोनं पोर्तुगालचा 1-0 च्या फरकानं पराभव केलाय. या पराभवासह पोर्तुगाल आणि ख्रिस्टियानो रोनाल्डो यांचं आव्हान संपुष्टात आलेय. या पराभवानंतर रोनाल्डोला अश्रू अनावर आले होते. मैदानाबाहेर जाताना रोनाल्डोच्या रोळ्यातून अश्रू वाहत होते. 






पहिल्या हाप मध्ये मोरक्कोने आघाडी घेतली -
उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यातील पहिल्या हाफमध्येच मोरक्कोनं 1-0 ने आघाडी घेतली होती. 42 व्या मिनिटाला यूसुफ एन नेसरी याने गोल करत मोरक्कोला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मोरक्कोनं शेवटपर्यंत कायम ठेवली. 50 व्या मिनिटानंतर पोर्तुगालने रोनाल्डोला मैदानात उतरले. पण  रोनाल्डोही पोर्तुगालला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 






मोरक्कोनं इतिहास रचला -
फिफा विश्वचषकाच्या इतिहासात मोरक्कोच्या आधी तीन आफ्रिका संघाने उपांत्य फेरीत प्रेवश केला होता, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 1990 मध्ये कॅमरून, 2002 मध्ये सेनेगल आणि 2010  घाना संघाला उपांत्य पूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. पोर्तुगालचा संघाने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारली आहे. फीफा वर्ल्ड कपच्या उपांत्य पूर्व फेरीत पोर्तुगालला दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. 1966 मध्ये डीपीआर कोरियानं तर 2006 मध्ये इंग्लंड संघाने पोर्तुगालचा पराभव केला होता.  






उपांत्य फेरीत कोण कोण पोहचलं? -
यंदाच्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहचणारा मोरक्को तिसरा संघ ठरलाय. याआधी अर्जेंटिना क्रोएशिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाने पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केले. तर मेस्सीच्या अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला होता. उपांत्य पूर्वी फेरीतील अखेरचा सामना इंग्लंड-फ्रान्स यांच्यात होणार आहे. विजेता संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे.