Lionel Messi Wins Ballon d’Or 2023 Award: प्रसिद्ध फुटबॉलपटू (Football) आणि जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या विश्वविक्रमी लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यानं आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. मेस्सीनं विक्रमी आठ वेळा फुटबॉल जगतातील बॅलन डी'ओर अवॉर्ड (Ballon d’Or Award 2023) पटकावला आहे. मेस्सीच्या या विक्रमामुळे जगभरातील चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून मेस्सीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लियोनेल मेस्सीसाठी यंदाचा बॅलन डी'ओर अवॉर्ड जिंकणं तसं सोपं नव्हतं. बॅलन डी'ओरच्या स्पर्धेत मेस्सीसमोर मँचेस्टर सिटीच्या एर्लिंग हॅलँडचं तगडं आव्हान होतं. एर्लिंगनं गेल्यावेळी तिहेरी खिताब जिंकला होता. पण, अखेर मेस्सीनं करुन दाखवलंच. बॅलन डी'ओर जिंकणारा मेस्सी पहिला MLS खेळाडू ठरला आहे. इंटर मियामीचे सर्वेसर्वा आणि फुटबॉलविश्वातील दिग्गज डेव्हिड बॅकहॅम यांच्या हस्ते मेस्सीला त्याच्या कारकिर्दीतील आठवा बॅलन डी'ओर अवॉर्ड देण्यात आला. 31 ऑक्टोबर 2023, सोमवारी पॅरिसमधील थिएटर डू शॅटलेटमध्ये रंगलेल्या सोहळ्यात मेस्सीला बॅलन डी'ओर अवॉर्डनं गौरवण्यात आलं.
लिओनेल मेस्सीनं यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. बॅलन डी'ओर हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉलपटूंच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीनं सोमवारी विक्रमी आठवा बॅलोन डी'ओरचा खिताब जिंकला आणि फुटबॉलच्या इतिहासात आपलं नाव कोरलं. दरम्यान, मँचेस्टर सिटीचा स्टार एर्लिंग हॅलँड मेस्सीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे, तर मेस्सीचा पीएसजीचा माजी सहकारी किलियन एमबाप्पे तिसऱ्या स्थानावर आहे. एटाना बोनामतीनं महिलांचा बॅलोन डी'ओर जिंकून स्पेनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तसेच, आठव्या बॅलन डीमध्ये एमी मार्टिनेजनं वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपरसाठीची याचिन ट्रॉफी जिंकली.
Ballon d'Or काय आहे?
Ballon d'Or अवॉर्ड फ्रांसमधील फुटबॉल मासिक बॅलन डिओरच्या वतीनं देण्यात येतो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1956 साली झाली, जेव्हा हा पुरस्कार स्टॅनले मॅथ्यूज यांना पहिल्यांदा देण्यात आला होता. तेव्हापासून हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच, 2018 पासून महिला फुटबॉलपटूंनाही हा पुरस्कार देण्यात येतो.