POR vs GHA, Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa World Cup 2022) गुरुवारी रात्री झालेल्या पोर्तुगाल विरुद्ध घाना (Portugal vs Ghana) सामन्यात पोर्तुगालने 3-2 ने विजय मिळवत, विजयाने विश्वचषक स्पर्धेची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano ronaldo) एका खास विक्रमाला (Ronaldo Record) यावेळी गवसणी घातली. 2006 पासून विश्वचषक खेळणाऱ्या रोनाल्डोने या सामन्याती एका गोलच्या मदतीनं पाच वेगवेगळ्या विश्वचषकात गोल करण्याचा रेकॉर्ड केला आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वचषक 2006 मध्ये पदार्पण झाले होते. त्या विश्वचषकात त्याने इराणविरुद्ध पेनल्टी स्पॉटवरून पहिला गोल केला. यानंतर चार वर्षांनंतर विश्वचषकात त्याने आणखी एक गोल केला होता. 2010 च्या विश्वचषकात रोनाल्डोने उत्तर कोरियाविरुद्ध गोल केला होता. विश्वचषक 2014 मध्ये घानाविरुद्धच्या सामन्यातही त्याने गोल केला होता. रोनाल्डोसाठी 2018 चा विश्वचषक खूपच प्रेक्षणीय होता. गेल्या विश्वचषकात त्याने चार गोल केले होते. यामध्ये त्याने स्पेनविरुद्ध त्याने हॅटट्रिक केली होती. ज्यानंतर यंदाच्या गोलच्या मदतीनं त्याने पाच विश्वचषकात आठ गोल केले असून वेगवेगळ्या पाच विश्वचषकात गोल करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
पोर्तुगलाचा घानावर 3-2 ने विजय
या सामन्यात हाल्फ टाईमपर्यंत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नव्हता. हाल्फ टाईमनंतर 65 व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी मिळाली जी रोनाल्डोने घेत गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच 73 व्या मिनिटाला घानाने उत्कृष्ट खेळ दाखवला आणि त्यांचा कर्णधार A Ayew याने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. मग युवा स्टार खेळाडू फेलिक्सने ब्रुनो फर्नांडिसच्या जबरदस्त असिस्टवर 78 व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगालची आघाडी वाढवली. ज्यानंतर काही मिनिटांतच म्हणजेच 80 व्या मिनिटाला पुन्हा ब्रुनोने दिलेल्या असिस्टवर लिओने गोल करत पोर्तुगालची आघाडी 3-1 अशी केली. ज्यानंतर पोर्तुगाल सहज जिंकेल असे वाचक होते. पण बुकारी याने 89 व्या मिनिटाला घानासाठी गोल करत सामना अजून बाकी आहे हे दाखवून दिले, मग अधिकची 9 मिनिटं देण्यात आली, ज्यात दोन्ही संघानी आक्रमणं केली. पण अखेर एकही गोल झाला नाही आणि 3-2 ने पोर्तुगालने सामना जिंकला.