Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) राऊंड ऑफ 16 मध्ये ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया (Brazil vs South Korea) हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी हा विजय अनिवार्य असून आज अर्थात सोमवारी मध्यरात्री उशिरा 12 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारवर (Neymar JR.) असतील. कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेमार या सामन्यातून वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करू शकतो. तो दुखापतीमुळे काही सामने बाहेर होता. 

दोघांच्या हेड टू हेड रेकॉर्डचा विचार केला तर फुटबॉल विश्वचषक इतिहासात ब्राझील आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  मात्र, याआधी दोन्ही संघांमध्ये सात फ्रेंडली मॅचेस झाल्या आहेत. ज्यामध्ये ब्राझीलने 6 सामने जिंकले आहेत. तर 1999 मध्ये एक सामना दक्षिण कोरियाने जिंकला होता. आता हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या प्री-क्वॉर्टर फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे एक चुरशीचा सामना होण्याची अपेक्षा आहे.   

नेमार मैदानात परतण्याची शक्यता

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार पायाच्या दुखापतीमुळे काही सामने विश्रांतीवर होता. पण आता तो दुखापतीतून सावरल्यानंतर ब्राझीलच्या दक्षिण कोरियाविरुद्धच्या विश्वचषकाची बाद फेरीच्या सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. त्याने पुन्हा सराव सुरू केला आहे. सर्बियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो सरावासाठी आला नव्हता. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. आता 6 डिसेंबरला ब्राझीलचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. त्यापूर्वी नेमारने ट्रेनिंग सुरु केली आहे. ब्राझीलच्या या स्टार फुटबॉलपटूने ट्वीट करून सराव सुरु केल्याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्याने, 'मला आता बरं वाटत आहे.' असं लिहित काही फोटोही शेअर केले होते.  

कधी, कुठे पाहाल सामना?

ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया हा बाद फेरीचा सामना आज मध्यरात्री उशिरा स्टेडियम 974 याठिकाणी रंगणार आहे. भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

राऊंड ऑफ 16 च्या उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक:

सामना संघ तारीख वेळ ठिकाण
Round of 16: Match- 5 जपान विरुद्ध क्रोएशिया 05 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता अल जनुब स्टेडियम
Round of 16: Match- 6 ब्राझील विरुद्ध कोरिया 06 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता स्टेडियम 974
Round of 16: Match- 7 स्पेन विरुद्ध मोरोक्को 06 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता एज्युकेशन सिटी स्टेडियम
Round of 16: Match- 8 पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड 07 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता लुसेल स्टेडियम

हे देखील वाचा-