मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 224 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मानं 162 धावा आणि अंबाती रायडूनं 100 धावा ठोकल्या. रोहितनं या सामन्यात विविध विक्रम आपल्या नावे केले. यामध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.


'सिक्सर किंग' रोहित


रोहितने 162 धावांच्या खेळीत चार षटकार ठोकले आणि सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सचिनला मागे टाकलं. रोहितने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दित 186 डावात 198 षटकार ठोकले आहे. भारताकडून सर्वाधिक षटकार महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहेत. धोनीने 281 डावात 218 षटकार ठोकले आहेत. भारतीय खेळाडूंच्या यादीत धोनीनंतर रोहितचा नंबर लागतो. सचिनने 452 डावात 195 षटकार मारले होते. रोहितला षटकारांचं द्विशतक साजरं करण्यासाठी केवळ दोन षटकारांनी गरज आहे. जगभरातील केवळ सहा फलंदाजांनी दोनशे षटकारांचा आकडा पार केला आहे.


सातव्यांदा 150 हून अधिक धावा


रोहितने आतंरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सातव्यांदा 150 हून अधिक धावा केल्या. सर्वाधिक दीड शतक ठोकण्याचा विक्रम रोहितच्याच नावे आहे. सचिन तेंडुलकर आणि डेविड वॉर्नरने प्रत्येकी पाच वेळा, ख्रिस गेल, हाशिम आमला, विराट कोहली आणि सनथ जयसूर्याने प्रत्येकी चार वेळा 150 हून अधिक धावा केल्या आहेत.


एका मालिकेत दोनवेळा 150 हून अधिक धावा


वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहितने दुसऱ्यांना 150 हून अधिक धावा ठोकल्या. गुवाहाटीमधील सामन्यात रोहितने 152 केल्या होत्या. याआधी जिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मास्कादजाने केनियाविरुद्ध 2009 मध्ये एकाच मालिकेत दोनदा 150 पेक्षा आधिक धावा केल्या होत्या.


विंडीजविरुद्ध मोठी धावसंख्या उभारणारा दुसरा भारतीय खेळाडू


वेस्ट इंडिजविरुद्ध 162 धावांची सर्वोच्च खेळी करणारा रोहित दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. वीरेंद्र सेहवाने 2011 मध्ये विंडीजविरोधात 219 धावांची खेळी केली होती.


वर्षभरातील सर्वोच्च खेळी करणार भारतीय खेळाडू


रोहितनं केलेली 162 खेळी या वर्षातील कोणा भारतीय खेळाडूची सर्वोच्च खेळी आहे. गेल्या सहा वर्षात सर्वोच्च खेळीचा हा विक्रम रोहतच्या नावे आहे. रोहितने 2013 मध्ये 209 धावा, 2014 मध्ये 150, 2016 मध्ये 171 धावा, 2017 मध्ये 208 आणि यावर्षी 162 धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्धची पाचवा एकदिवसीय सामना भारताचा या वर्षातला शेवटचा एकदिवसीय सामना असणार आहे.