कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी तडजोड करून एफआरपीचे तुकडे पाडल्यानं शेतकरी अडचणीत आल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरात ऊस दरासंदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटना वगळता इतर शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रघुनाथ पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर यावेळी सडकून टीका केली आहे. "राजू शेट्टी खासदार झाल्यापासून ऊसाच्या रिकव्हरीचा बेस वाढत गेला आहे. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी तडजोड करून दोन वर्षापूर्वी 80 : 20 असे एफआरपीचे तुकडे पाडले. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे हडप करण्यासाठी राजकीय पक्षांनी राजू शेट्टी यांना उभं केलं आहे", असा आरोपच रघुनाथ पाटीलांनी राजू शेट्टींवर केला.
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्री आणि खासदार राजू शेट्टी यांना लक्ष्य केलं आहे. "एकीकडे गुजरात पॅटर्न राबवा म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या उपस्थितीत एक रकमी एफआरपीचा कायदा मोडला गेल्याच सांगितलं. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एकरकमी एफआरपी 14 दिवसांच्या आत देण्याची व्यवस्था झाली पाहिजे", असं देखील रघुनाथ पाटील यांनी म्हटलं.
या वर्षी ऊसाला 3500 रुपये भाव मिळाला पाहिजे. तसेच मागील एफआरपीचा उर्वरित हप्ता मिळाला नसल्याने 3 नोव्हेंबरला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.