रशियातला फिफा विश्वचषक एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा दाखल झाला तो मॉस्कोतल्या सेंट ल्युझनिकी स्टेडियमवर. विश्वचषकाच्या या 31 दिवसांच्या प्रवासात 63 सामन्यांमध्ये तुम्ही आम्ही अनुभवला तो तब्बल 163 गोल्सचा थरार. आणि आता मॉस्कोचं ल्युझनिकी स्टेडियम सज्ज झालं आहे विश्वचषकाच्या निर्णायक लढाईसाठी.
या लढाईत आमनेसामने उभे ठाकल्या आहेत दोन फौजा... एक आहे ह्यूगो लॉरिसच्या फ्रान्सची, तर दुसरी ल्युका मॉडरिचच्या क्रोएशियाची.
स्पेशल रिपोर्ट : फ्रान्सला ‘बीस साल बाद’ विश्वविजेता बनण्याची संधी!
फ्रान्सने आजवरच्या इतिहासात 1998 साली एकदाच विश्वचषकावर आपलं नाव कोरलं, तर क्रोएशियानं यंदा पहिल्यांदाच विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. रशियातल्या विश्वचषकाच्या टॉप फाईव्ह फौजांमध्ये फ्रान्सचा समावेश होताच, पण क्रोएशिया कानामागून आला आणि तिखट झाला.
1998 सालच्या विश्वचषकात गाठलेली उपांत्य फेरी हीच क्रोएशियाची आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे उपांत्य फेरीच्या त्या सामन्यात फ्रान्सनेच क्रोएशियाचं आव्हान 2-1 असं संपुष्टात आणलं होतं.
FIFA : भल्याभल्यांचा अंदाज चुकवणाऱ्या क्रोएशियाच्या यशाचं गमक काय?
विश्वचषकाच्या रणांगणात फ्रान्स आणि क्रोएशियाच्या फौजा बीस साल बाद पुन्हा आमनेसामने आल्या आहेत. पण यावेळी लढाई ही फायनलची आहे. त्यामुळे लढाई निकराची होणार. कारण विश्वचषक फ्रान्सला हवा आहे, तसा क्रोएशियालाही.
फ्रान्स आणि क्रोएशियानं फायनलमध्ये कशी धडक मारली?
विश्वचषकाच्या क गटात फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला 2-1 असं हरवून विजयी सलामी दिली. मग फ्रान्सने पेरुवर 1-0 अशी मात केली. त्यानंतर फ्रान्स आणि डेन्मार्कचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. फ्रान्सने खरी कमाल केली ती बाद फेरीत. फ्रान्सने उपउपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचं आव्हान 4-3 असं मोडून काढलं. मग फ्रान्सनं उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेचा 2-0 असा फडशा पाडला. त्यानंतर फ्रान्सनं बेल्जियमला 1-0 असं नमवून फायनलचं तिकीट बुक केलं.
विश्वचषकाच्या ड गटावर क्रोएशियानं निर्विवाद वर्चस्व राखलं. क्रोएशियानs नायजेरियाचा 2-0 असा, अर्जेंटिनाचा 3-0 असा आणि आईसलँडचा 2-1 असा पराभव करुन निर्भेळ यश संपादन केलं. क्रोएशियानं उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशी, तर उपांत्यपूर्व फेरीत रशियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशी मात केली. मग क्रोएशियानं जादा वेळेत इंग्लंडचं आव्हान 2-1 असं उधळून उपांत्य फेरीचा उंबरठा ओलांडला.
विश्वचषकाच्या फायनलमध्ये फ्रान्सच्या आक्रमणाची मदार ही प्रामुख्यानं अॅन्टॉईन ग्रिझमन आणि किलियान एमबापे यांच्यावर राहील. त्या दोघांनीही प्रत्येकी तीन तीन गोल झळकावले आहेत. ग्रिझमननं तर दोन गोल्ससाठी सहाय्यकाचीही भूमिका बजावली आहे. बेंजामिन पॅवार्ड, सॅम्युअल उमटिटी आणि राफेल वरान यांनीही एकेक गोल लगावून आक्रमणात आपली कामगिरी चोख बजावली आहे.
दुसरीकडे कर्णधार ल्युका मॉडरिच, मारियो मानझुकिच आणि इव्हान पेरिसिच हे तिघं क्रोएशियाच्या आक्रमणाचे प्रमुख आधारस्तंभ ठरले आहेत. त्या तिघांनी क्रोएशियाकडून प्रत्येकी दोन गोलची नोंद केली आहे. इतकंच नाही, तर त्या तिघांनी आणखी एकेका गोलसाठी सहाय्य केलं आहे. त्याशिवाय बडेल, रेबिक, विडा, रॅकिटिच आणि क्रामारिक यांनी प्रत्येकी एक गोल मारला आहे.
कर्णधार ह्युगो लॉरिस आणि डॅनियल सुबासिच यांचा गोलरक्षकाच्या भूमिकेतलं पोलादी संरक्षण हे फ्रान्स आणि क्रोएशियाच्या बचावाचं मुख्य वैशिष्ट्य ठरावं. फ्रान्सला बेल्जियमविरुद्धची उपांत्य लढाई सॅम्युअल उमटिटीच्या गोलनं जिंकून दिली असली तरी या सामन्यात ह्युगो लॉरिसचं गोलरक्षण निर्णायक ठरलं होतं.
क्रोएशियानं डेन्मार्क आणि रशियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवलेल्या विजयांचा प्रमुख शिल्पकार हा गोलरक्षक डॅनियल सुबासिचच होता.
फ्रान्स आणि क्रोएशियाचं बलाबल लक्षात घेता, त्या फौजांमध्ये होणारी फायनलची लढाई अटीतटीची होण्याची चिन्हं आहेत. वास्तविक उभय संघांत आजवर झालेल्या पाच सामन्यांमध्ये फ्रान्सनं वर्चस्व गाजवलं आहे. 1998 ते 2011 या कालावधीत झालेल्या झालेले पाचपैकी तीन सामने फ्रान्सनं जिंकले आहेत, तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.
उभय संघ सात वर्षांनी पुन्हा आमनेसामने येत आहे. त्या लढाईत फ्रान्स हा तुलनेत बलाढ्य असला तर क्रोएशिया धोकादायक संघ आहे. त्यामुळे 2018 सालचा विश्वचषक जिंकणार कोण, याची उत्सुकता अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहणार आहे.