लंडन : भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स वन डेत लियाम प्लंकेटच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत वन डे कारकीर्दीतल्या दहा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा धोनी भारताचा चौथा तर जगातला बारावा फलंदाज ठरला.

वन डेत दहा हजार धावा पूर्ण करत धोनीने त्याच्या यशस्वी कारकीर्दीतला एक मैलाचा दगड पार केला. भारताच्या वन डे क्रिकेटच्या इतिहासात धोनीच्याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने दसहजारी टप्पा ओलांडला होता. त्यात सचिननं 18 हजार चारशे सव्वीस, गांगुलीने 11 हजार 221 आणि द्रविडने 10 हजार 768 झळकावल्या आहेत. भारताच्या या रथीमहारथींच्या यादीत आता धोनीचा समावेश झाला आहे.

यष्टिरक्षक या नात्यानं दहा हजार धावा करणारा धोनी जगातला केवळ दुसरा यष्टिरक्षक ठरला. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने दहा हजार धावा करणारा पहिला यष्टिरक्षक होण्याचा मान मिळवला होता.

धोनीने आजवर 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 320 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. या कालावधीत धोनीने 51.57च्या सरासरीने 10,004 धावांचा रतीब घातला आहे. त्यात दहा शतकं आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे.

केवळ फलंदाज म्हणून नव्हे तर भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणूनही धोनीकडे पाहिलं जातं. धोनीनं 60 कसोटी,199 वन डे आणि 72 ट्वेन्टी ट्वेन्टीत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. या कालावधीत धोनीनं 2007 साली भारताला  ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक मिळवून दिला. त्यानंतर 2011च्या वन डे विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं 1983 नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला. तर 2013ला चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा करत आयसीसीच्या तिन्ही महत्वाच्या स्पर्धा जिंकून देणारा तो जगातला पहिला कर्णधार बनला.

याशिवाय यष्टीरक्षक म्हणूनही धोनीने चारशे विकेट्सचा टप्पा पार केला आहे.

गेल्या काही वर्षात धोनीमधल्या आक्रमकतेची धग कमी झाली असली तरी त्याच्या फलंदाजीतलं सातत्य अजूनही कायम आहे. वयाच्या 37व्या वर्षीही त्याची धावा घेतानाची चपळाई युवा खेळाडूंनाही लाजवणारी ठरते. त्यामुळेच दस हजारी शिलेदारांच्या यादीत आज धोनीचा समावेश झाला आहे.