मोस्को (रशिया) : फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज रंगणार आहे. सामन्यात हॅरी केनच्या इंग्लिश आर्मीची गाठ ल्युरा मॉडरिचच्या क्रोएशियन फौजेबरोबर पडणार आहे. हा सामना रात्री साडेअकरा वाजता रशियातल्या ल्युझनिकी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सनं बेल्जियमला धूळ चारत रशियातल्या फिफा विश्वचषकात फायनलमेध्य धडक मारली आहे. त्यामुळं आता इंग्लंड आणि क्रोएशिया या दोन संघांमधून फ्रान्ससमोर उभं कोण ठाकतं, याविषयी फुटबॉलविश्वात उत्सुकता निर्माण झाली आहे.
इंग्लंड आणि क्रोएशियाचा इतिहास
आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या आजवरच्या इतिहासात इंग्लंड आणि क्रोएशियाच्या फौजा सातवेळा एकमेकांना भिडल्या आहेत. त्यात इंग्लंडनं चारवेळा बाजी मारली आहे, तर केवळ एकच सामना क्रोएशियाला जिंकता आला आहे. यंदा फिफा विश्वचषकाच्या मैदानात हे दोन संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
यंदाच्य़ा विश्वचषकातील इंग्लंडची कामगिरी
प्रशिक्षक गेरेथ साऊथगेटच्या इंग्लंडनं यंदाच्या विश्वचषकात जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. इंग्लंडनं गटात तीनपैकी दोन सामने जिंकून बाद फेरी गाठली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाचं आणि उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनचं आव्हान मोडीत काढून हॅरी केनचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आलाय.
यंदाच्य़ा विश्वचषकातील क्रोएशियाची कामगिरी
ल्युका मॉडरिचच्या क्रोएशियानं ‘ड’ गटात तीनपैकी तीन सामने जिंकून अव्वल स्थान राखल आहे. क्रोएशियानं नायजेरियाचा 2-0, आईसलँडचा 2-1 आणि बलाढय अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव केला होता. क्रोएशियाला उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मात्र विजयासाठी झुंजावं लागलं. डेन्मार्क आणि रशियाविरुद्धच्या या दोन्ही सामन्यांत क्रोएशियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं ते पेनल्टी शूटआऊटवर. त्यामुळं आता इंग्लंडविरुद्धच्या लढाईत बाजी मारायची असेल तर मॉडरिच आणि त्याच्या शिलेदारांना रणनीती आखावी लागणार आहे.
मॉडरिचच्या क्रोएशियासमोरील आव्हानं
मॉडरिचच्या संघासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते हॅरी केनचं. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोलसाठीच्या गोल्डन बूटच्या शर्यतीत हॅरी केन आघाडीवर आहे. हॅरी केननं आतापर्यंत चार सामन्यात सहा गोल झळकावले आहेत. त्यात साखळी सामन्यातल्या एका हॅटट्रिकचाही समावेश आहे. त्यामुळे केनला रोखणं क्रोएशियाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. याशिवाय रहिम स्टर्लिंग, मार्कस रॅशफर्ड, जॉर्डन हेण्डरसन, एरिक डायर यांचं आक्रमण थोपवणं हेही क्रोएशियासमोरचं आव्हान असेल.
क्रोएशियाचा ताफा
क्रोएशियाच्या ताफ्यात कर्णधार ल्युका मॉडरिचसह डोमॅगोज विडा, जोसिप पिवारिच, इवान रॅकेटिच, मिलान बेडेल, मारियो मानझुकीच यांच्यासारखे युवा शिलेदार आहेत. पेनल्टी शूटआऊटवरच्या दोन्ही विजयांमध्ये निर्णायक कामगिरी बजावणारा गोलरक्षक डॅनिएल सुबासिचवरही क्रोएशियाची मदार राहिल.
इंग्लंडने आजवरच्या इतिहासात 1966 साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. आता तब्बल 52 वर्षांनी इंग्लंडला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे. क्रोएशिया तर आपल्या पहिल्यावहिल्या विश्वचषकासाठी उत्सुक आहे. रशियातल्या ल्युझनिकी स्टेडियमवर इंग्लंड आणि क्रोएशिया संघांमधून फायनलचं तिकीट कोण कन्फर्म करणार, याची जगभरातल्या फुटबॉलरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
FIFA 2018 : इंग्लिश आर्मी vs क्रोएशियन फौज, कोण जाणार फायनलमध्ये?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2018 12:15 PM (IST)
रशियातल्या ल्युझनिकी स्टेडियमवर इंग्लंड आणि क्रोएशिया संघांमधून फायनलचं तिकीट कोण कन्फर्म करणार, याची जगभरातल्या फुटबॉलरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -