मुंबई: मुंबईसह उपनगरात गेल्या चार दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर तुंबलेलं पाणी ओसरत आहे. त्याचाच परिणाम म्हणून 24 तासांहूनही अधिक काळ बंद असणारी विरार स्टेशनवरुनची रेल्वे सेवा अखेर हळूहळू सुरु झाली आहे. आज सकाळी साडे आठच्या सुमारास विरारवरुन चर्चगेटसाठी जाणाऱ्या 5 लोकल सोडण्यात आल्या आहेत.
मात्र रुळांवर काही प्रमाणात अजूनही पाणी असल्यामुळे लोकल चक्क 10 किलोमीटर प्रतीतास या वेगानं चालवल्या जात आहेत. पाणी ओसल्यावर रेल्वे सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
तुफान पावसामुळे नालासोपारा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. परिणामी पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते भाईंदरपर्यंतच सुरु होती. मात्र आता ती विरारपर्यंत सुरु झाली आहे.
मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईकडे आणि मुंबईतून बाहेरही जाऊ शकत नाहीत.
हवामानाचा अंदाज
काल मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस नोंदवण्यात आला. सलग चौथ्या दिवशी मुंबई पाण्यानं भरली होती. राज्यभर पावसाचा जोर वाढलेला असतानाच, मान्सूनची सिमा अजूनही स्थिर बघायला मिळतेय.
मान्सूनचे ढग संपूर्ण राज्यभर दाट पसरलेले दिसून येत आहेत.
कोकण-गोव्यातील अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा अजूनही कायम आहे. येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१० जुलै म्हणजे काल पडलेल्या पावसाची विभागवार आकडेवारी....
कोकण विभागात सरासरी ३५.३ मिमी पाऊस होतो. तिथे ८३.५ मिमी म्हणजे सरासरीच्या १३६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
मध्य महाराष्ट्रात सरासरी ८.७ मिमी पाऊस पडतो. तिथे ८.३ मिमी म्हणजे सरासरीच्या ४ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला.
मराठावाड्यात सरासरी ५ मिमी पाऊस होतो. तिथे १२ मिमी म्हणजेच सरासरीच्या १४० टक्के जास्त पाऊस झाला.
तर विदर्भात सरासरी १०.३ मिमी पाऊस होतो. तिथे २७.१ मिमी म्हणजेच १३६ टक्के जास्त पाऊस झाला.
संपूर्ण राज्यात सरासरी ११ मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा २२.९ मिमी म्हणजेच सरासरीच्या १०८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.