ल्योन: फिफा महिला फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अमेरिकन महिलांनी शानदार खेळाचे प्रदर्शन करत नेदरलँड्सवर 2-0 ने विजय मिळवत विश्वविजेतेपद प्राप्त केले. अमेरिकेचे हे चौथे विश्वविजेतेपद ठरले असून याआधी 1991, 1999आणि  2015 मध्ये फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

अंतिम सामन्यात अमेरिकेकडून  मेगन रेपिनोआणि रोज लावेले ने एक- एक गोल केला. रेपिनोने पेनाल्टी शूट आउटवर तर लावेलेने फील्ड गोल केला.

उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या रेपिनोला गोल्डन बूट पुरस्कार देण्यात आला. तिने स्पर्धेत एकूण सहा गोल केले.



अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. नेदरलँड्सने या हाफमध्ये खेळावर नियंत्रण ठेवत अमेरिकेला  संधीच दिली नाही.

दुसऱ्या हाफमध्ये मात्र अमेरिकेचा दबदबा पाहायला मिळाला. नेदरलँड्सचा संघ या या हाफमध्ये पूर्णपणे दबावात दिसून आला. याचाच फायदा घेत अमेरिकेने 61 व्या मिनिटाला गोल केला. स्टार खेळाडू मॉर्गन विरोधात एक फाऊल झाल्याने अमेरिकेला पेनाल्टी मिळाली.

रेपिनोने कुठलीही चूक न करता अमेरिकेच्या खात्यात एक गोल केला. त्यानंतर आठव्या मिनिटाला लावेले हिने एक गोल करून संघाला मोठी आघाडी मिळवून देत विजयावर शिक्कामोर्तब केले.