लखनौ : उत्तर प्रदेशात यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला. आग्रा एक्स्प्रेसवेवर उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची एसी बस झरना नाल्यात कोसळली. यामध्ये आतापर्यंत 29 जणांना मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या बसमध्ये 44 प्रवासी होते.

मृतांमध्ये दीड वर्षांची मुलगी, 15 ते 16 वर्षांच्या मुलीसह 27 पुरुषांचा समावेश आहे. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी एन जी रवी यांनी दिली.

6 पदरी यमुना एक्स्प्रेसवे 165 किलोमीटर लांबीचा आहे. ह एक्स्प्रेसवे ग्रेटर नोएडाला आग्राशी जोडतो. 2012 मध्ये या एक्स्प्रेसवे बांधण्यात आला होता.

पुलावरुन 50 फूट खोल बस कोसळली
ही बस लखनौहून दिल्लीच्या दिशेने आनंद विहार इथे येतो होती. बस ज्या नाल्यात कोसळली तो पुलापासून 50 फूट खोल आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ही अवध डेपोची जनरथ बस होती. यामध्ये एकूण 44 प्रवासी होते. एत्मादपूर परिसरात हा अपघात झाला. पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात?
अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण चालकाला डुलकी लागल्याने त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झालं, असं म्हटलं जात आहे.

मदतीची घोषणा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातावर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना सरकार पाच लाख रुपये देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळानेही पाच लाखांच्या नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.