FIFA lifts suspension of AIFF : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी नुकतीच तातडीने काढल्याचं समोर आलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिल्यानंतर आता इंडियन फुटबॉलने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी फिफाकडून बंदी उठवण्याबाबतचं आलेलं पत्रदेखील त्यांनी ट्वीटमध्ये जोडलं आहे.






फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर भारतीय फुटबॉल क्लब्सना परदेशातील स्पर्धांत खेळणं अवघड झालं होतं. याशिवाय यंदा ऑक्टोबर महिन्यात होणारा 17 वर्षांखालील महिला विश्वचषक देखील भारतात होणार नाही असे समोर येत होते. पण आता ही बंदी उठवल्यामुळे ही भव्य स्पर्धाही भारताला होस्ट करण्याची संधी पुन्हा मिळाली आहे. याबाबतही इंडियन फुटबॉलने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन माहिती दिली आहे









भारतीय फुटबॉलमध्ये सुरू झालेला संपूर्ण वाद एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावरुन सुरु झाला होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही निवडणूक न घेताच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ते बसल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. प्रफुल्लचा कार्यकाळ 2009 पासून सुरू झाला, जो 2020 मध्ये संपला. असे असतानाही ते अजूनही अध्यक्षपदी आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती. न्यायालयाने मे 2022 मध्ये संपूर्ण बोर्ड रद्द केले होते आणि नवीन घटना तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यानंतरही योग्य निर्णय न झाल्याने फिफाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.  


फिफा काय आहे?


International Federation of Association Football अर्थात 'फिफा' ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 'फिफा' हे फ्रेंचमधील Fédération internationale de Football Association याचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत. 


हे देखील वाचा-