पाकिस्तानच्या फखर जमानचं वनडेत द्विशतक
पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने जिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावलं आहे. जिम्बाब्वेविरुद्ध खेळताना फखरने 210 धावांची खेळी केली.

नवी दिल्ली : पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने जिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावलं आहे. जिम्बाब्वेविरुद्ध खेळताना फखरने 210 धावांची खेळी केली. फखर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा सहावा फलंदाज ठरला आहे. भारताच्या रोहीत शर्माच्या नावावर सर्वाधिक 3 द्विशतक आहेत.
जिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील क्विन स्पोर्ट्स क्लबमधील चौथ्या सामन्यात फखरने 156 चेंडूत 5 षटकार आणि 24 चौकारांच्या मदतीने 210 धावा ठोकल्या. फखरच्या द्विशतकाच्या जोरावर पाकिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 399 धावांचा डोंगर उभा केला.
पाकिस्तानकडून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम फखरने आपल्या नावे केला आहे. याआधी 1997मध्ये भारताविरुद्ध सईद अनवरने 194 धावांची खेळी केली होती.
याशिवाय एकदिवसीय सामन्यांमधील 399 ही पाकिस्तानची सर्वोच्च धावसंख्याआहे. याआधी बांगलादेशविरुद्ध 2010साली 385/7 ही पाकिस्तानची सर्वोच्च धावसंख्या होती.
याच सामन्यात फखर आणि इमाम-उल-हक (113 धावा) यांनी 304 धावांची पार्टनरशिप केली. एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च पार्टनरशिप आहे. याआधी श्रीलंकेच्या सलामीची जोडी उपुल थरंगा आणि सनथ जयसु्र्याने इंग्लंडविरुद्ध 286 धावांची पार्टनरशिप केली होती.
एकदिवसीय सामन्यातील द्विशतक 1. रोहित शर्मा (भारत)- 264 धावा
2. मार्टिन गप्टिल (न्यूजीलंड) 237* धावा
3. वीरेंद्र सहवाग (भारत) 219 धावा
4. ख्रिस गेल (वेस्टइंडीज) 215 धावा
5. फखर जमान (पाकिस्तान) 210* धावा
6. रोहित शर्मा (भारत) 209 धावा
7. रोहित शर्मा (भारत) 208* धावा
8. सचिन तेंडुलकर (भारत) 200* धावा























