मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकवणाऱ्या खेळाडूंचा प्रवासही प्रेरणादायी असतो. अवघड परिस्थितीवर मात करुन अव्वल स्थान गाठणाऱ्या क्रीडापटूंच्या आयुष्यात मानवी भावनांचेही विविध कंगोरे पाहायला मिळतात. सुवर्णपदक विजेत्या केनियाच्या धावपटूने तर आपल्या गावातील अंधारही दूर केला आहे.


 
रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत केनियाच्या फेथ किपायगॉन हिने सुवर्णपदक पटकवलं. फेथच्या गावात यापूर्वी वीज पोहोचली नव्हती. मात्र प्रकाशझोतात आल्यानंतर फेथच्या गावकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे.

 
फेथ किपायगॉनने सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिचे वडील सॅम्युअल यांनी केनियाच्या पंतप्रधानांकडे गावात वीज पोहचवण्याची मागणी केली. गावात वीज पोहोचली तर मी लेकीला धावताना नीट पाहू शकेन, ती देशासाठी यापुढेही अशीच कामगिरी करत राहील, याचा मला विश्वास आहे, असंही सॅम्युअल म्हणतात.

 
फेथच्या वडिलांच्या मागणीची तात्काळ दखल घेत तिच्या गावात वीज पोहोचवण्याचं काम सुरु झालं. अवघ्या नऊ दिवसांच्या कामानंतर गावात वीज पोहचली. सॅमसंग कंपनीने तर चक्क एका फ्लॅट टेलिव्हिजनचीही सोय करुन दिली.

 
फेथच्या वडिलांनी संबंधितांचे आभार व्यक्त केले. 'फेथ माझी मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. फेथला देशासाठी पदकं जिंकण्यासाठी सामर्थ्य मिळो अशी प्रार्थना करतो, अशा भावनाही सॅम्युअल यांनी व्यक्त केल्या.