मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन आणि सोशल मीडियावरील वाचाळवीर अशी ख्याती असलेला कमाल खान यांच्यात आता ऑनलाईन युद्ध छेडलं आहे. आपला महत्त्वाकांक्षी चित्रपट 'शिवाय'चं नुकसान करण्यासाठी कट रचल्याचा आरोप अजयने केआरके आणि करण जोहरवर केला आहे.
अजयच्या 'शिवाय' आणि करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटांची दिवाळीला बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. करण आणि कमाल आर खान यांनी मिळून कट रचल्याचा संशय अजय देवगनने व्यक्त केला आहे. अजयने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
अजयने ट्वीट केलेल्या एका ऑडिओमध्ये कमाल खान आणि सहनिर्माते कुमार मंगत यांच्यातील बातचित रेकॉर्ड केली आहे. 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाचा वाईट रिव्ह्यू न देण्याबद्दल करण जोहरने आपल्याला 25 लाख दिल्याचा दावा या टेपमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळेच अजयने करण जोहरवरही संशयाची सुई रोखली आहे.
केआरके अनेक चित्रपटांची रिव्ह्यूमधून खिल्ली उडवतो. यावेळी अजयच्या 'शिवाय'वर त्याने निशाणा साधला. अजय देवगनने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याचा समाचार घेतला आहे. 'मी गेल्या 25 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. माझे वडीलही अॅक्शन दिग्दर्शक होते. अशात कमालसारखा कोणी माणूस उठून आमच्या सिनेमाला वाईटसाईट बोलतो. पैसे उकळण्यासाठी त्याने हा डाव आखला आहे' असं अजय म्हणतो.
https://twitter.com/ajaydevgn/status/771384971449597952
या प्रकरणाची प्रामाणिकपणे पडताळणी व्हायला हवी, जर करण जोहरचा खरंच यामागे हात असेल, तर त्याचाही तपास व्हावा, अशी मागणी अजयने केली आहे.
https://twitter.com/kamaalrkhan/status/771415382934650880
https://twitter.com/kamaalrkhan/status/771416199532077057
केआरकेने मात्र कुमार मंगत आणि अजय यांनीच आपल्याला 25 लाखांची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'विषयी वाईट बोलण्यास त्यांनी पैशांची लालुच दाखवली, मात्र आपण ती नाकारल्याचं केआरके सांगतो.