लंडन: भारताच्या जसप्रीत बुमरानं इंग्लंडच्या अॅलिस्टर कूक आणि ज्यो रुटला एकाच षटकात माघारी धाडून ओव्हलच्या पाचव्या कसोटीला कलाटणी दिली. भक्कम सुरुवात केलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसअखेर एक बाद 133 धावांवरुन सात बाद 198 अशी झाली.
भारताकडून ईशांत शर्मानं तीन, तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं. इंग्लंडच्या डावात अॅलिस्टर कूकनं कीटन जेनिंग्सच्या साथीनं सलामीला 60 आणि मोईन अलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. त्यामुळं इंग्लंडला 63 षटकांत 133 धावा जमवता आल्या होत्या. त्याच धावसंख्येवर बुमरानं कूक आणि रूटला माघारी धाडून खेळाची सूत्रं टीम इंडियाच्या हाती आणून दिली. त्यामुळं पुढच्या 27 षटकांत इंग्लंडनं अवघ्या 65 धावांत सहा विकेट्स गमावल्या.
'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न
या सामन्यात ज्यो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय कूक-जेनिंग्सने सार्थ ठरवला. जेनिंग 23 धावा करुन माघारी परतल्यानंतर, अखेरचा सामना खेळणाऱ्या कूकने खेळाची सूत्रं हाती घेतली. कूक-मोईन अलीने इंग्लंडला भक्कम स्थितीत पोहोचवलं. मात्र चहापानानंतर बूमराने कूकला त्रिफळाचीत केलं आणि इंग्लंडची घसरगुंडी सुरु झाली.
कूक बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी कर्णधार ज्यो रुट आला. मात्र त्याचा जम बसण्यापूर्वीच बुमराने त्याला पायचीत करुन, भोपळाही फोडू दिलं नाही. तीच परिस्थिती जॉनी बेअर्स्टोची झाली. त्याला ईशांत शर्माने विकेटकीपर ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं.
मग बेन स्टोक्सचा अडथळा रवींद्र जाडेजाने दूर केला. स्टोक्स केवळ 11 धावा करुन तंबूत परतला. एका बाजूने फलंदाज माघारी परतत असताना, दुसऱ्या बाजूला प्रमोशन मिळालेला मोईन अली उभा होता. मात्र नंतर तोही अडखळला. ईशांत शर्माने मोईन अलीला 50 धावांवर बाद केलं. त्यानंतर संपूर्ण कसोटीत टीम इंडियाची डोकेदुखी ठरलेल्या सॅम करनला ईशांत शर्मानेच आल्या पावली माघारी धाडलं. सॅम करन बाद झाला त्यावेळी इंग्लंडची अवस्था 7 बाद 181 अशी होती. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी जोस बटलर 11, तर आदिल रशीद 4 धावांवर खेळत आहे.
संबंधित बातम्या
'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न
पृथ्वी शॉला संधी नाहीच, हनुमा विहारीचं कसोटी पदार्पण
अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च!