मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 8 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांवर निर्बंध असतील, असं महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

16 टनांपेक्षा अधिक वजन असलेल्या ट्रक, मल्टीएक्सेल, ट्रेलर तसंच रेती, वाळू आणि गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ही बंदी असेल. मात्र जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.

गणेशभक्तांना टोल फ्री
गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या हजारो नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. या निर्णयानुसार, कोकणात जाण्यासाठी 11 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली केली जाणार नाही. याशिवाय कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही टोल फ्री प्रवास करता येणार आहे. गणेशभक्तांना परतीचा प्रवासही टोल फ्री होणार आहे.

खड्डेमय मुंबई-गोवा महामार्ग
गेल्या तीन महिन्यात मुंबई-गोवा हायवेवर बहुतांश ठिकाणी खड्डयांचं साम्राज्य पसरलं आहे. यंदाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुंबई ते सिंधुदुर्ग दौरा केला आणि 9 सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं.

पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या मार्गातील कर्नाळा अभयारण्य, पेण ते वडखळ दरम्यानचा टप्पा, नागोठणे नजीकचा मार्ग, वाकण ते सुकेळी खिंड, खांब गावानजीकचा रस्ता अशा बहुतांश मार्गाची अवस्था आजही बिकट आहे. या संपूर्ण मार्गावर पाऊस झाल्यास चिखल होतो, तर ऊन पडल्यास धुळ पसरत असल्याने दुचाकीस्वारांचे पुरते हाल होतात. यामुळे पेण ते कोलाड दरम्यानचे सुमारे 50 किलोमीटर अंतर गाठायला किमान दीड तासांचा अवधी लागतो.

खड्डे पाहणी दौऱ्यानंतर पाटील काय म्हणाले?
डिसेंबर 2019 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होईल, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं. ते म्हणाले की, पाऊस उघडीप देत नसल्याने रस्त्याची स्थिती खूप वाईट हे मान्य करावं लागेल. सायन-पनवेल महामार्गावर 9 स्पॉट खाडीवर असल्याने डांबर तिथे टिकणार नाही, त्याठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करणार
आहे. 13 तारखेपासून काम सुरु करु, याासाठी 77 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढच्या पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी खड्डे पडणार नाहीत.