वाहनचालकांकडून कित्येक वेळा वाहतुकीचे नियम सर्रासपणे तोडले जातात. नियमांना वाट दाखवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. गेल्या आठ महिन्यांत दहा लाख वाहनधारकांकडून 22 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
झेब्रा क्रॉसिंगचा नियम न पाळणाऱ्या तीन लाख 37 हजार 384 वाहनधारकांना सात कोटी रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे.
तर हेल्मेट न घालणाऱ्या 37 हजार दुचाकीस्वारांकडून दोन कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. लेनचा नियम न पाळणाऱ्या 354 वाहनधारकांना 71 हजारांचा दंड करण्यात आला. तर सिग्नल तोडणे आणि इतर नियमांचा भंग केल्याप्रकरणी 12 कोटींचा दंड ठोठावला गेला आहे. नियम मोडल्यानंतरही आपली चूक मान्य करतील, तर ते पुणेकर कसले? उलट वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यात ते धन्यता मानतात.
बेशिस्त पुणेकरांना नियमांचं महत्व कळावं, यासाठी वाहतूक पोलिसांनी एक अफलातून प्रयोग केला. एका कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या प्रत्येक नियमाचं पालन करत कात्रज ते शिवाजीनगर असा प्रवास केला, तर दुसऱ्याने तोच प्रवास नियमांचं उल्लंघन करत केला.
नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्याला या प्रवासासाठी 24 मिनिटं लागली, तर नियमांचं पालन करणाऱ्या कर्मचाऱ्याला 28 मिनिटांचा कालावधी लागला. त्यामुळे अवघ्या 4 ते 5 मिनिटांसाठी स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाशी खेळणं, कितपत योग्य आहे? हा प्रश्न उरतोच.
पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या... यामुळे वाहतूक कोंडी हे पुणेकरांचं दुखणं झालं आहे. मात्र नियम वाहनांच्या चाकाखाली तुडवणं, हा यावरचा उपाय नाही. सर्वांनी मिळून वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं ठरवलं, तर वाहतूक कोंडीवर मार्ग निघू शकेल.