मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारा World Test Championshipचा अंतिम सामना हा ड्यूक बॉलनं खेळवला जाणार आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स या मैदानावर होणं अपेक्षित होतं. पण, आता मात्र हा सामना साउथम्पटनमध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


आयसीसीकडून सामना नेमका कुठं होणार याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, येत्या काही दिवसांतच याबाबतची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर, साउथम्पटनमधील एजेस बॉल स्टेडियम येथे हा सामना पार पडणार असल्याचं कळत आहे. 


India Legends vs England Legends : सामना हरलो पण मनं जिंकली, इरफान, गोनीची धडाकेबाजी खेळी


कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळं सामन्याचं ठिकाण बदललं जात असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघानं हल्लीच इंग्लंडच्या संघाचा कसोटी मालिकेमध्ये 3-1 असा धुव्वा उडवत डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत धडक मारली. ज्यासाठी न्यूझीलंडचा संघ आधीच पात्र ठरला होता. आता या दोन्ही संघांमध्ये 18 ते 22 जूनपर्यंत अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी 23 जून हा दिवस रिजर्व्ह डे म्हणून ठेवण्यात आला आहे. 


आता हे ड्यूक बॉल प्रकरण नेमकं काय?


फार आधीपासून ड्यूक बॉलचा वापर क्रिकेटविश्वात केला जात आहे. याशिवाय एसजी किंवा कुकाबुरा बॉलचाही वापर केला जात आहे. ड्यूक बॉल तयार करणारी कंपनी ही जगातील बॉल निर्मितीसाठी ओळखली जाणारी सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीला जवळपास 225 वर्षांचा इतिहास असल्याचं म्हटलं जातं. 


दिलीप जजोदिया या भारतीय व्यक्तीकडे या कंपनीची मालकी आहे. 1962 मध्ये ते इंग्लंडमध्ये पोहोचले. तिथं त्यांची मॉरेंट ही कंपनी क्रिकेच्या सामानाची निर्मिती करु लागली. 1987 मध्ये त्यांनी ड्यूक कंपनी खरेदी केली. 'क्रिकेट नेक्स डॉट कॉम'ला दिलेल्या मुलाखतीनुसार हा चेंडू स्कॉटीश गाईच्या कातड्यापासून बनवण्यात येतो. ज्यामध्ये एंगस प्रजातीच्या गायीच्या कातड्याचा वापर होतो. ड्यूक बॉल हा फोर क्वार्टर चेंडू आहे. म्हणजेच चामड्याच्या चार तुकड्यांना जोडून हा चेंडू तयार करण्यात येतो.