सांगली :  वसंतदादा साखर कारखान्यातील विक्री केलेल्या मालावरचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा 12 कोटी 44 लाख इतक्या रकमेचा  VAT (मूल्यवर्धित कर) न भरल्याने  वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्षसह 16 संचालकांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला विनय मिस्कीन यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.  मात्र या कारवाईचा श्री दत्त इंडिया कंपनीशी काही संबंध नसल्याचे दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितलं आहे.


सप्टेंबर 2017 पासून श्री दत्त इंडिया कंपनीनें वसंतदादा कारखाना चालवायला घेतला आहे. वसंतदादा कारखान्याकडून कंट्री लिकरचे उत्पादन करून इतर व्यापाऱ्यांना  या मालाची विक्री केली गेली. यावेळी व्यापाऱ्यांकडून  35 टके मूल्यवर्धित कर भरून घेतला पण कारखान्याने हा कर शासनाच्या तिजोरीत भरला नाही. साधारण ऑक्टोबर 2017 ते 2021 सालापासूनचा हा मूल्यवर्धित कर थकीत असल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.


या कालावधीत एकूण 9 कोटी 8 लाख 35 हजार 647 इतका कर थकीत होता. या रकमेचे व्याज 3 कोटी 36 लाख 18 हजार 304 इतके झाले. अशाप्रकारे  एकूण 12 कोटी 44 लाख 53 हजार 951 इतका मूल्यवर्धित कर थकीत असल्याप्रकरणी  कारखाना प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली होती.मात्र तरीही कारखानाने हा मूल्यवर्धित कर शासनाकडे जमा केला नाही. त्यामुळे याबाबतची  तक्रार पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली होती.


तक्रारीनंतर सांगलीतील संजयनगर पोलीस स्टेशन मध्ये वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्षसह 16 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या मध्ये वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकांचा समावेश  आहे.  संभाजी मेंढे, मंगल पाटील, शिवाजी पाटील, संपत माने, रणजितसिंह पाटील, सुरेश पाटील, सुनील आवटी, अमित पाटील, यशवंतराव पाटील, अशोक अनुगडे, महावीर पाटील, विक्रमसिंह पाटील, दौलतराव शिंदे, अण्णासाहेब पाटील, जिनेश्वर पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकाची नावे आहेत.