एक्स्प्लोर
Advertisement
दिव्यांश सक्सेना, यशस्वी जैस्वाल युवा विश्वचषकासाठी सज्ज; अजिंक्य रहाणेच्या उपस्थितीत युवा शिलेदारांचा गौरव
भारताच्या अंडर नाईन्टिन विश्वचषक संघात निवड झालेल्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांचा दादर युनियन स्पोर्टिंग क्लबच्या वतीने काल संध्याकाळी (05 डिसेंबर) सत्कार करण्यात आला. भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
मुंबई : भारताच्या अंडर नाईन्टिन विश्वचषक संघात निवड झालेल्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांचा दादर युनियन स्पोर्टिंग क्लबच्या वतीने काल संध्याकाळी (05 डिसेंबर) सत्कार करण्यात आला. भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, दिव्यांशचे प्रशिक्षक अशोक कामत आणि सुरेंद्र माने उपस्थित होते.
दिव्यांश आणि यशस्वी हे क्लब क्रिकेटमध्ये दादर युनियन संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे दादर युनियन स्पोर्टिंग क्लब आणि दिलीप वेंगसरकर यांच्या पुढाकाराने त्या दोघांनाही गौरवण्यात आले. जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत अंडर नाईन्टिन विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना आणि अथर्व अंकोलेकर या मुंबईच्या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
यशस्वी जैस्वालने यंदाच्या मोसमात धावांचा रतीब घातला आहे. त्याच्या भन्नाट कामगिरीमुळे विजय हजारे करंडकात त्याला मुंबई संघात स्थान देण्यात आले होते. 17 वर्षांच्या यशस्वीने मिळालेल्या संधीचा फायदा उठवताना झारखंडविरुद्ध विक्रमी 203 धावांची खेळी केली होती. या कामगिरीसह यशस्वी लीस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता.
दिव्यांश सक्सेनानेही दादर युनियन आणि वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे प्रतिनिधित्व करताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. डावखुऱ्या दिव्यांशने फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कारकीर्दीच्या पहिल्याच सामन्यात 122 धावांची खेळी साकारली होती. पण अंडर नाईन्टिन आशिया चषकातून त्याला वगळण्यात आले होते. तरीदेखील इंग्लंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत त्याने सात सामन्यांत 400 धावा करुन पुन्हा एकदा संघात आपली जागा तयार केली आहे.
विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवणारा तिसरा मुंबईकर शिलेदार म्हणजे डावखुरा फिरकी गोलंदाज अथर्व अंकोलेकर. अथर्वने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध पाच विकेट्स घेऊन भारताचा विजय खेचून आणला होता. याशिवाय त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
17 जानेवारी ते 9 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या युवा विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची धुरा उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गकडे सोपवण्यात आली आहे. 2017 प्रमाणेच यंदाही भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असा विश्वास यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांशनं एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
राजकारण
राजकारण
Advertisement