Mumbai Indians : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केले. रोहित शर्माने IPL 2013 च्या मध्यभागी कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि त्याच मोसमात प्रथमच आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. त्यानंतर, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये देखील, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनले आणि 5 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणारा पहिला संघ बनला.


चेन्नईत धोनी अभेद्य, मग मुंबईत काय झालं? 


टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सुरुवातीपासून चेन्नई संघाचा कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. चेन्नई संघामध्ये इतर संघाच्या तुलनेत कमी बदल झाले असले, तरी धोनीच्या क्षमतेवर आणि नेतृत्वावर कधीच शंका उपस्थित केली नाही.  धोनी हा चालू मोसमातील सर्वाधिक वयस्कर 42 वर्षांचा कॅप्टन असेल. मात्र, तरीही चेन्नईचा धोनीवरील विश्वास कायम आहे. दुसरीकडे, मुंबईला पाचवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितला कॅप्टन पदावरून दूर केल्याने चाहत्यांना सुद्धा पचनी पडलेलं नाही. रोहित 36 वर्षाचा असला, तरी त्याची प्रतिभा अवघ्या जगाने नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये पाहिली. त्यामुळे त्याची लय आणि नेतृत्व क्षमता पाहता इतका तडकाफडकी निर्णय का झाला? याचं उत्तर मिळालेलं नाही. संघाने भविष्याचा आधार घेतला. मात्र, धोनीच्या तुलनेत  रोहित अजूनही 6 वर्षांनी लहान आहे. यावरून त्यांचा अंदाज फोल ठरतो.   


लिलावात मुंबई इंडियन्सची रणनीती काय असेल?


आयपीएल 2021 ते 2023 या काळात मुंबईचा अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. अशा परिस्थितीत, आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, मुंबईने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला त्यांच्या संघात सामील करून घेतले आणि नंतर त्याला कर्णधार बनवले. मुंबई इंडियन्सचे ग्लोबल डायरेक्टर महेला जयवर्धने यांनी सांगितले की, एमआयचे भविष्य लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सची स्थिती बदललेली दिसते. अशा परिस्थितीत नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ लिलावाच्या रणनीतीत काही बदल करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सची रणनीती काय असू शकते आणि कोणत्या खेळाडूंवर त्यांची नजर असेल, याची चर्चा रंगली आहे. 


मुंबईकडे किती पैसे आणि स्लॉट शिल्लक आहेत?


या लिलावात येण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने 82.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या पर्समध्ये फक्त 17.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. या लिलावात मुंबई जास्तीत जास्त 8 खेळाडू विकत घेऊ शकते, त्यापैकी जास्तीत जास्त 4 परदेशी खेळाडू असू शकतात. सध्या मुंबईच्या संघात एकूण 17 ळाडू आहेत.


रिलीज खेळाडू : मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॉन्सन, झ्ये रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर


कायम आणि ट्रेड केलेले खेळाडू : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, देवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. टिळक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पांड्या.


वेगवान गोलंदाजांची गरज भासेल


मुंबई इंडियन्सच्या रणनीतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक किंवा दोन विदेशी वेगवान गोलंदाज खरेदी करणे, कारण त्यांनी यावेळच्या लिलावापूर्वी त्यांच्या 5 विदेशी वेगवान गोलंदाजांना सोडले होते, त्यापैकी एक जोफ्रा आर्चर होता. त्यामुळे मुंबई संघ आपल्या बजेटनुसार किमान एका वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यामध्ये मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, गेराल्ड कोझी किंवा दक्षिण आफ्रिकेचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज बुरॉन हेंड्रिक्स यांसारख्या गोलंदाजांचा समावेश असू शकतो.


अष्टपैलू खेळाडूवरही नजर असेल 


याशिवाय मुंबई संघाने कॅमेरॉन ग्रीनलाही सोडले आहे, ज्याच्या जागी किरॉन पोलार्डला संधी देण्याचा संघाने प्रयत्न केला होता. अशा परिस्थितीत मुंबईचा संघही कॅमेरून ग्रीनसारख्या अष्टपैलू गोलंदाजाच्या मागे जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईचा संघ न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल किंवा अफगाणिस्तानचा अजमतुल्ला ओमरझाई या खेळाडूंच्या नावावरही बोली लावू शकतो.


फिरकीपटूंवरही नजर असेल


याशिवाय मुंबईला एक-दोन फिरकी गोलंदाजांचीही गरज आहे, कारण सध्या त्यांच्या संघात पियुष चावला आणि कुमार कार्तिकेय यांच्याशिवाय विशेष फिरकीचा पर्याय नाही. त्यामुळे हा संघ अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांच्यावरही मोठा सट्टा खेळू शकतो.


इतर महत्वाच्या बातम्या