ठाणे : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, तसेच कुणबी नोंदी (Kunbi Records) शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती (Shinde Committee) तत्काळ रद्द करावी या मागणीसाठी राज्यभरात ओबीसी मेळावे होत आहे. दरम्यान, आज (रविवारी 17 डिसेंबर) रोजी ठाणे जिल्ह्यामधील (Thane District) भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या सभेत छगन भुजबळ नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, एकीकडे आंतरवालीत मराठा समाजाची बैठक होत असून, दुसरीकडे ठाण्यात भुजबळांची ओबीसी सभा होत आहे. 


मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नयेत यासाठी भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांच्याकडून राज्यभरात ओबीसी सभा देखील घेतल्या जात आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला भुजबळ यांच्यासह अनेक महत्वाचे ओबीसी नेते हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्याकडून सतत भुजबळ यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे आजच्या सभेतून भुजबळ जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. 


वर्ध्याच्या सभेत नागरिकांनी पाठ फिरवली... 


दरम्यान, शनिवारी वर्धा जिल्ह्यात देखील ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित असणार होते. मात्र, अकरा वाजता सुरू होणारी ही सभा, दुपारी एक वाजता सुरू झाली. तरीही सभेच्या ठिकाणी गर्दीच नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. 25 हजार लोकांची गर्दी होण्याचा दावा करण्यात आला असतांना, 500 लोकांची जमवाजमव करतांना आयोजकांनी दमछाक होतांना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे आपली तब्येत ठीक नसल्याचे कारण देत भुजबळ देखील या सभेला गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वर्धा येथील ओबीसी सभेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


आंतरवालीत सुद्धा बैठक... 


एकीकडे ठाण्यात ओबीसी मेळावा होत असतांना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आजच्या सभेतून भुजबळ हे या बैठकीवर काही बोलणार का? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. तसेच, या सभेला कोण-कोणते ओबीसी नेते येणार याकडे देखील ओबीसी बांधवाचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'हा जो काय त्याचा लाड चाललाय, ते काही कळत नाही', शिष्टमंडळाच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया