मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे क्रिकेटच्या दुनियेचा जणू मिनी विश्वचषक. मोजके आठच संघ, 18 दिवसांचाच कालावधी आणि झटपट फॉरमॅट यांमुळं चॅम्पियन्स ट्रॉफीची ओळख मिनी विश्वचषक अशी होत असली तरी या स्पर्धेचं आव्हान विश्वचषकाइतकंच मोठं आहे.

आयसीसीच्या या चॅम्पियन्स ट्रॉफीला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत असून, गतविजेती टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी राखणार का असा प्रश्न भारतीय चाहत्यांच्या मनात आहे.

वन डे क्रिकेटच्या दुनियेत एकेकाळी टीम इंडियाच्या वर्चस्वाचा होता. धोनीच्याच नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं दिनांक 2 एप्रिल 2011 रोजी वन डेचा विश्वचषक जिंकला होता. पण खरी कमाल म्हणजे धोनीच्या टीम इंडियानं अवघ्या सव्वा दोन वर्षांच्या कालावधीत इंग्लंडमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही आपल्या मालकीची केली. हा सारा इतिहास आठवण्याचं कारण म्हणजे त्याच इंग्लंडमध्ये पुन्हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण सजलंय.

इंग्लंडमध्ये एक ते अठरा जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2015 या दिवशी आयसीसीच्या वन डे क्रमवारीत पहिल्या आठ क्रमांकांवर असलेल्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट देण्यात आलं आहे.

एका जमान्यात वन डे क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारं वेस्ट इंडिज त्या टॉप-एट संघांमध्ये कुठंच नव्हतं. त्यामुळंच 2004 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरलेला आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा विद्यमान विजेता असलेला वेस्ट इंडिजचा संघ यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार नाही आणि हेच क्रिकेटच्या दुनियेचं सर्वात मोठं दुर्दैव ठरावं.

इंग्लंडमधल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन लीग कम नॉकआऊट पद्धतीनं करण्यात आलं आहे. त्यासाठी स्पर्धेतल्या आठ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यजमान इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बांगलादेश या चार संघांचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. गतविजेत्या भारतासह पाकिस्तान, श्रीलंका आणि आयसीसीच्या वन डे क्रमवारीत नंबर वनवर असणारा दक्षिण आफ्रिका या चार संघांना ब गटात स्थान देण्यात आलं आहे. अ आणि ब गटात पहिल्या दोन क्रमांकांवर येणाऱ्या संघांना बाद पद्धतीच्या उपांत्य सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्या दोन उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे दोन संघ रविवार, 18 जूनच्या फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतील.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा फॉरमॅट दिसायला सोपा असला तरी, वन डे विश्वचषकाच्या तुलनेत हा फॉरमॅट आव्हानात्मक आहे. विश्वचषकात अधिक संघाचा समावेश असल्यानं एखाद्या पराभवानंतरही सावरण्याची संधी मिळू शकते. पण चॅम्पियन्स ट्रॉफीत ती मुभा नाही. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीची स्वत:ची एक स्वतंत्र प्रतिष्ठा आहे.

क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकली, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं पहिलं आयोजन हे 2002 साली श्रीलंकेत झालेलं दिसतं. पण त्याआधी दोनवेळा आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी या नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 1998 साली बांगलादेशात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजला हरवून, तर 2000 साली केनियात न्यूझीलंडनं भारताला हरवून आयसीसी नॉकआऊट ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर आयसीसी नॉकआऊट ट्रॉफीचं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असं नामकरण करण्यात आलं.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 2002 सालच्या फायनलवर पावसानं पाणी फेरलं. त्यामुळं भारत आणि श्रीलंका संघांना संयुक्त विजेतेपद बहाल कऱण्यात आलं. त्यानंतर 2004 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वेस्ट इंडिजनं जिंकली. 2006 आणि 2009 अशी लागोपाठ दोन वर्षे ऑस्ट्रेलियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. 2013 साली टीम इंडियानं इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

त्यानंतर आयसीसीनं जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेचं कारण पुढे करून, खरं तर 2013 सालीच चॅम्पियन्स ट्रॉफीला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. पण आयसीसीला वर्षभरातच त्या निर्णयात पुन्हा बदल करणं भाग पडलं. मग आयसीसीनं जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेवरच फुल्ली मारून, 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद इंग्लंडला बहाल केलं.

योगायोगानं 2019 सालच्या वन डे विश्वचषकाचं आयोजनही इंग्लंडमध्येच कऱण्यात येणार आहे. त्यामुळं यजमानांच्या दृष्टीनं आणि सहभागी संघांच्याही दृष्टीनं यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही आगामी आयसीसी विश्वचषकाची लिटमस टेस्ट असेल.