नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे माजी मंत्री कपिल मिश्रा आणि आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली.
विधानसभेतील या घटनेनंतर कपिल मिश्रा यांनी उप राज्यापालांकडे भेटण्यासाठी वेळ मागितला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी बाहेर काढण्यासाठी मार्शलला आदेश दिला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या इशाऱ्यानंतर आमदार जवळ आले आणि बाचाबाची केली, असा आरोप कपिल मिश्रांनी केला आहे.
विधानसभा अध्यक्षांना काल पत्र लिहून पाच मिनिटांचा वेळ मागितला होता. अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांनी केलेल्या गैरव्यवहाराविषयी रामलीला मैदानात विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यांवर 'आप'च्या आमदारांनी मारहाण केली, असा आरोप कपिल मिश्रांनी केला आहे.
कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. कपिल मिश्रांची काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी केजरीवाल सरकारवर एकामागोमाग एक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
आम आदमी पार्टीचं स्पष्टीकरण
जीएसटी मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशनाचं कामकाज सुरु होताच भाजप आमदारांनी औषधांच्या मुद्द्यांवर बोलण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या चर्चेसाठी तयारही होते. मात्र कपिल मिश्रा यांनी गोंधळ घातला. ते वेलमध्ये आले, त्यानंतर आमदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मार्शल्सने बाहेर काढलं. त्यांना कोणतीही मारहाण करण्यात आली नाही, असं स्पष्टीकरण ‘आप’ने दिलं आहे.