CWG2018: सव्वा तासात 3 विजय, महाराष्ट्राचा राहुल आवारे अंतिम फेरीत!
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2018 10:47 AM (IST)
दरम्यान, राहुलचा अंतिम सामना आज दुपारी 12 वाजता कॅनडाचा पैलवान स्टीफन तकाहाशीसोबत होणार आहे.
मेलबर्न : महाराष्ट्रातील बीडचा गुणी पैलवान राहुल आवारे रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी मिळाली नसली तरी ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याची दमदार कामगिरी सुरु आहे. राहुल आवारेने पुरुषांच्या 57 किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. राहुलने अवघ्या सव्वा तासात कुस्तीचे तीन सामने जिंकून फायनल गाठली. सेमीफायनलमध्ये राहुल आवारेने भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी देश असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला धोबीपछाड दिला. अतिशय अटीतटीच्या सामन्यात राहुल आवारेने कडवी झुंज देत 12-8 असा विजय मिळवला. या विजयानंतर फायनलमध्ये धडक देत त्याने भारतासाठी रौप्यपदक निश्चित केलं आहे. राहुलने याआधी त्याच्या दोन सामन्यात तांत्रिक वर्चस्वाच्या जोरावर उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. राहुलने पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या जॉर्ज रामवर 4-0 असा विजय मिळवला होता. राहुलच्या तुलनेत जॉर्ज कामगिरी फारच सुमार असल्याने रेफ्रीने राहुल आवारेला विजयी घोषित केलं. तर पुढच्या सामन्यात राहुल आवारेने ऑस्ट्रेलियाच्या थॉमस चिचिहिनीला मात देऊन उपांत्य सामन्यात प्रवेश केला. दरम्यान, राहुलचा अंतिम सामना आज दुपारी 12 वाजता कॅनडाचा पैलवान स्टीफन तकाहाशीसोबत होणार आहे. त्यामुळे आणखी एक सुवर्ण पदक मिळण्याची भारतीयांची अपेक्षा उंचावली आहे. प्रो रेसलिंग लीग : राहुल आवारेने संदीप तोमरला लोळवलंबबिता फोगटचा सलग तिसरा विजय दुसरीकडे महिलांच्या 53 किलो फ्री स्टाईल कुस्तीत भारताच्या बबिता कुमारीने सलग तिसरा विजय मिळवला आहे. बबिताने राऊंड रोबिनमधील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या दीपिका दिलहानीवर 4-0 असा विजय मिळवला. बबिताने एकाच डावात दीपिकाला चीतपट करुन विजय मिळवला. त्याआधी बबिताने पहिल्या सामन्यात नायजेरियाच्या बोस सॅम्युअलला मात दिली. हा सामना तिने 3-1 ने जिंकला. बबितानेही भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. पैलवान राहुल आवारेचा ऑलिम्पिकच्या शर्यतीतून पत्ता कटसुशील कुमार फायनलमध्ये दुसरीकडे भारताचा पैलवान सुशीलकुमारने पुरुषांच्या 74 किलो कुस्ती प्रकाराच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये सुशीलने ऑस्ट्रेलियाच्या कोनोर इवान्सवर 4-0 ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुशीलने याआधी उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानच्या मोहम्मद बटवर 4-0 अशा विजय मिळवला होता. गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे. 2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकांची लयलूट भारताने केली आहे