नवी दिल्ली: काँग्रेसच्या इन्स्टंट उपोषणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषण करुन प्रतिउत्तर देणार आहेत.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवल्याने, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपोषण करणार आहेत.
मोदी दिल्लीतील आपल्या कार्यालयात, तर अमित शहा कर्नाटकातील हुबळीत उपोषण करतील. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत तर इतर राज्यातील भाजप नेतेही उपोषणाला बसणार आहेत.
सकाळी 11 ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत हे आत्मक्लेष उपोषण करण्यात येणार आहे.
दरम्यान याच मुद्द्यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओविसी यांनी मोदींवर टिका केली.
मुख्यमंत्र्यांचं भाजप कार्यालयात उपोषण
भाजप तर्फे देशभर करण्यात येणाऱ्या एकदिवसीय उपोषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार,
आमदार अॅड पराग अळवणी हे भाजपच्या विले पार्ले इथल्या कार्यालयात उपोषण करणार आहेत.
सोमय्यांचं रेल्वे स्टेशनवर उपोषण
भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे मुंबईतील भांडूप स्टेशन (पश्चिम) इथे उपोषण करणार आहे.
रेल्वेमंत्र्यांचं ठाण्यात उपोषण
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात आत्मक्लेश उपोषण करण्यात येणार आहे. सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शासकीय विश्रामगृह व कोर्टनाक्याजवळ हे उपोषण करण्यात येईल.
दिवसभर उपोषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसभर आपल्या कार्यालयातच उपोषण करणार आहेत. तर अमित शाह कर्नाटकातील हुबळी इथं सांकेतिक धरणं देणार आहेत. विरोधी पक्ष विकासकामात अडथळे आणत असल्याचं, मोदींनी नुकतंच चंपारण्य इथं म्हटलं होतं.
भाजप खासदारही उपोषण करणार
एकीकडे मोदी कामकाजाच्या वेळीच आपल्या कार्यालयात उपोषण करणार आहेत, तर त्यांना पाठींबा म्हणून भाजपचे खासदारही एक दिवसाचं उपोषण करणार आहेत.
स्वत:च्या मतदारसंघात भाजप खासदार उपोषण करणार आहेत.
अधिवेशन वाया
पाच मार्चला सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र चर्चेविनाच संपलं. यासाठी विरोधक आणि सरकारने एकमेकांकडे बोट दाखवलं.
बँक घोटाळ्यावरुन काँग्रेसने पहिले पाच दिवस कामकाज होऊ दिलं नाही, तर त्यानंतर वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता.
याव्यतिरिक्त काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीएमनेही कामकाज ठप्प केलं होतं.