पणजी (गोवा) : दाबोळी विमानतळावर 26 लाख 40 हजार रुपये किंमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या दाबोळीतील  पथकाने बुधवारी ही कारवाई केली. विमानाच्या आसनातील एअरबॅगच्या पॉकेटमध्ये अज्ञात हवाई प्रवाशांनी 928 ग्रॅम वजनाचे सोने तस्करीच्या हेतूने ठेवले होते. मात्र त्यांचा प्रयत्न फसला.

दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या पथकाला तस्करीच्या सोन्याची गोवामार्गे हवाई वाहतूक होणार असल्याचा सुगावा लागला होता. त्यानुसार या पथकाने प्रवाशांवर पाळत ठेवली होती.

या कारवाईचा भाग म्हणूनच दुबईहून दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या एअर इंडियाच्या विमानाची या पथकाने झडती घेतली असता, या विमानाच्या एका मोकळ्या आसनातील एअरबॅग पॉकेटमध्ये दोन छोट्या पॅकेटमध्ये दहा तोळ्याची 8 सोन्याची बिस्किटे आढळून आली. हे सोने 928 ग्रॅम एवढे आहे.

तस्री पकडली जाण्याच्या भितीनेच अज्ञात हवाई प्रवाशाने हे सोने तिथेच टाकून दाबोळी विमानतळावरून निसटण्यात यश मिळवले. हे सोने कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त करुन त्या प्रवाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवासी सापडू शकला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 26 लाख 40 हजार रुपये आहे.