मुंबई : भारतीय क्रिकेट जगात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटलावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणाऱ्या विराट कोहली (virat kohli) यानंही जीवनातील एका टप्प्यावर अतिशय आव्हानात्मक अशा नैराश्यग्रस्त परिस्थितीचा सामना केला आहे. 2014 मध्ये खराब आणि सातत्यहिन कामगिरीमुळं विराटनं स्वत:लाच कमी लेखण्यास सुरुवात केली. सर्वजण आजुबाजूला असूनही विराटच्या मनावर एकटेपणाच्या भावनेनं घर केलं होतं.


मदतीसाठी कोणी नाही आलं असा त्याचा सूर मुळीच नव्हता. पण, त्या प्रसंगी मनात सुरु असणारी घालमेल पाहता आपल्याशी नेमक्या मुद्द्यावर बोलण्यास कोणीही नाही, अशीच त्याची खंत होती. अखेर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी विराटचं बोलणं झालं आणि त्याच्याशी संवाद साधल्यानंतर विराटला एक दिशा मिळाली.


विराटनं त्याच्या जीवनतील अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर केलेला खुलासा पाहून आता खुद्द सचिननंही यावर प्रतिक्रिया दिली आहे.


INDvsENG : विराट कोहली तिसऱ्या कसोटीला मुकणार? एका सामन्याची बंदी येण्याची शक्यता


ट्विट करत सचिननं यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. विराट, मला तुच्या यशाचा आणि खासगी जीवनातील हा अनुभव सर्वांसमक्ष बोलण्याच्या निर्णयाचा अभिमान आहे. ‘हल्लीच्या दिवसांमध्ये सोशल मीडियावर तरुणाईबाबत लगेचच पूर्वग्रह बांधले जात आहेत. त्यांच्याबद्दल अनेकजण बोलतात, पण त्यांच्यासोबत बोलायला मात्र कोणीच नसतं. आपण त्यांना पुढं येण्यासाठी सहकार्य करत सल्ला देण्याची गरज आहे.’, असं ट्विट सचिननं केलं.


मोठा खुलासा! यशशिखरावर असणारा विराट एकटा पडतो तेव्हा....


सचिननं नेमकी काय मदत केली होती?


इंग्लंडच्या संघातील माजी खेळाडू मार्क निकोलस याच्याशी संवाद साधताना विराट म्हणालेला, ‘मी सचिनशी या (नैराश्याच्या) मुद्द्यावर बोललो होतो. त्यानं मला सल्ला दिला होता की आपल्याला नकारात्मक भावनांना सामोरं जाण्याची काहीच गरज नाही. अशा प्रकारच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्याची गरज असते. नकारात्मक भावनांशी लढण्याचा किंवा त्यांच्याबाबत जास्त विचार करण्याचा प्रयत्न तुम्ही केला असता या भावना आणखी बळावतात, असं सचिननं मला सांगितलं होतं. ज्यामुळं मला या परिस्थितीतून बाहेर पडण्यास फार मदत झाली होती’.


संघासोबत मानसोपचारतज्ज्ञ असणं महत्त्वाचं


जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत असणाऱ्या विराट कोहली यानं क्रिकेटसंघासोबत मानसोपचारतज्ज्ञ असणं महत्त्वाचं असल्याची बाब अधोरेखित केली. विराटनं दिलेला हा सल्ला आणि मानसिक आरोग्याचंही दैनंदिन जीवनात असणारं महत्त्वं पाहता किमान येत्या काळातही या मुद्द्याकडे अतिशय गांभीर्यानं पाहिलं जाण्याची आणि विचार करण्याची सुरुवात होईल हीच शा आता अनेकांनी व्यक्त केली आहे.