मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघातील एक असं नाव, ज्या नावाभोवती प्रसिद्धी, क्रीडारसिकांचं प्रेम या साऱ्याचं एक वेगळंच वलय तयार झालं आहे. विराट आणि त्याची क्रिकेट या खेळाप्रती असणारी आत्मियता ही  केवळ शब्दांत व्यक्त करणंही कठीण. विराट फक्त मैदानात आल्यावर क्रीडारसिकांचा होणारा कल्ला, त्याच्यावर संघाचा आणि संघ व्यवस्थापनाचा असणारा विश्वास हे सारंकाही मान्य. पण, हाच विराट जीवनात एका अशा टप्प्यावरही पोहोचला होता, जिथं त्याला अतिशय एकाकी वाटत होतं.

एकटेपणाची भावना ही व्यक्तीला अंतर्मनातून कमकुवत करते. विराटसोबतही हे सारं घडलं. त्यालाही एकटेपणाचा सामना करावा लागला. खरंतर हे सारं विश्वास बसण्याजोगं नाही, पण तरीही हेच कटू सत्य आहे ज्याचा खुलासा खुद्द विराटनंच केला आहे.

IPL 2021 Auction | आयपीएल लिलाव - कोणासाठी जॅकपॉट तर कोणासाठी तारणहार, कोणत्या खेळाडूला किती बोली?


2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान विराट नैराश्याचा सामना करत होता. इथं त्याच्या मनात एकटेपणाच्या भावनेनं घर केलं होतं. या जगात आपण अगदीच एकटे आहोत अशीच मन हेलावणारी भावना त्याला खचवून गेली होती. इंग्लंडच्या संघातील माजी खेळाडू मार्क निकोलस याच्या ‘नॉट जस्ट क्रिकेट पॉडकास्ट’ या कार्यक्रमात विराटनं याबाबतचा खुलासा केला. फलंदाजीमध्ये आलेल्या अपयशामुळं विराटला या साऱ्याचा सामना करावा लगला होता.

‘हो, मी नैराश्याचा सामना केला’

तू केव्हा नैराश्याचा सामना केला आहेस का, असा प्रश्न विचारला असता यावर विराटनं कशाचीही तमा न बाळगता, होकारार्थी उत्तर देत म्हटलेलं, ‘हो मी नैराश्याचा सामना केला होता.’

रोज सकाळी तुम्ही धावा करण्यास सक्षम नाही, या भावनेनं जागं होणं ही अजिबातच चांगली गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वच फलंदाज याच दडपणाखाली होते की तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या नियंत्रणात नाहीत, असं म्हणत नेमकं या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं हेच तुम्हाला कळत नाही, ही बाब त्यानं अधोरेखित केली होती. हा तोच काळ होता जेव्हा विराटनं सारी हत्यारं टाकून दिली होती. आपण या जगात एकटे पडलो आहोत हीच भावना त्याला सतावत होती. मुळात जीवनात आधार देणारी मंडळी असूनही विराटला एकटं वाटत होतं. त्याला त्यावेळी क्रिकेट कारकिर्दीच्या दृष्टीनं मदत मिळणं अपेक्षित आणि आवश्यक होतं.

जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या विराटनं यावेळी मानसिक स्वास्थ्य़ कितपत महत्त्वाचं आहे, हे सांगत याकडे दुर्लक्ष करणं वेळप्रसंगी भविष्यंही संकटात टाकू शकतं हा थेट इशारा दिला.