Washington Sundar Ruled Out Of Zimbabwe ODI Series: गेल्या एक वर्षापासून सातत्यानं दुखापतींशी झुंज देत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांच्या एकिदिवसीय मालिकेत त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण इथेही त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. वॉशिंग्टन सुंदर खांद्याच्या दुखापतीमुळं झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावं लागलंय. काऊंटी क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन सुंदर उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. यातच त्याचं संघाबाहेर होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


वॉशिंग्टन सुंदरला  लँकेशायरकडून खेळताना गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये झालेल्या रॉयल लंडन वन डे चषकादरम्यान सुंदरच्या खांद्याला दुखापत झाली. तेव्हापासून तो झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, तो झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. वॉशिंग्टन सुंदरला खांद्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी काही वेळ लागणार आहे, अशा परिस्थितीत तो झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळू शकणार नाही, अशीही माहिती पीटीआयनं दिलीय.


एक वर्षापासून दुखापतींशी झुंज
वॉशिंग्टन सुंदरला मागील काही महिन्यांपासून दुखापतींच्या समस्यांना सामारे जावा लागलं आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी वॉशिंग्टन सुंदरच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळं तो -पाच महिने संघाबाहेर होता.त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं पुनरागमन केले. तसेच जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली. परंतु, यापूर्वीच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यानं पुन्हा भारतीय संघात कमबॅक केलं. पण, हाताच्या दुखापतीमुळं त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं. दरम्यान, बोटाच्या दुखापतीमुळं त्याला आयपीएल पंधराव्या हंगामातील काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. आयपीएलनंतर त्यानं इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. जिथं त्यानं चांगली कामगिरी केली. परंतु, खांद्याच्या दुखापतीनं त्याच्या कारकिर्दीत पुन्हा व्यत्यय आणलाय.


सहा वर्षानंतर भारताचा झिम्बाब्वे दौरा
दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. 


झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.


हे देखील वाचा-