Fifa Suspend AIFF: फिफाने (International Federation of Association Football) अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर (AIFF) मोठी कारवाई केली आहे. फिफाने भारतीय फुटबॉल फेडरेशनला तात्काळ प्रभावाने निलंबित (Fifa Suspend AIFF) केले आहे. त्याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतले आहे. तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन फिफाने ही कारवाई केली आहे.
फिफाने दिलेल्या माहितीनुसार, फिफाच्या कार्यकारणीने सर्वसंमतीने भारतीय फुटबॉल फेडरेशनला 'अनुचित हस्तक्षेप' मुद्यावर निलंबित करण्याचा निर्णय घेतला. फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
फिफाने म्हटले की, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे.
फिफाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरून निलंबन करण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाने भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर फिफाने निलंबनाचा इशारा दिला. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या 28 ऑगस्ट रोजी निवडणुका होणार आहेत. या प्रकरणी 17 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने फिफाने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यावर वक्तव्य केले होते. फिफाचा इशारा फारसा गांभीर्याने न घेण्याचे छेत्रीने म्हटले होते. फिफाच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता खेळाडूंनी आपल्या खेळाकडे लक्ष द्यावे असे छेत्रीने म्हटले असल्याचे वृत्त होते.
फिफा काय आहे?
International Federation of Association Football अर्थात 'फिफा' ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 'फिफा' हे फ्रेंचमधील Fédération internationale de Football Association याचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: