नवी दिल्ली: भारताची यंग ब्रिगेड शुभमन गिलच्या नेतृत्त्वात सध्या झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर आहे. भारतानं दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अभिषेक शर्मानं (Abhishek Sharma) टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्या मॅचमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध शुन्यावर बाद झाला. तर, पहिल्या मॅचमधील अपयश दूर करुन अभिषेक शर्मानं दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये शतक झळकावलं. अभिषेक शर्माकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. अभिषेक शर्माला  माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं (Yuvraj Singh) प्रशिक्षण दिलं आहे. अभिषेक शर्माच्या कामगिरीवर युवराज सिंगनं भाष्य केलंय.


अभिषेक शर्मानं भारतीय संघात स्थान मिळवलं यामध्ये युवराज सिंगचं योगदान आहे. अभिषेक शर्मानं सनरायजर्स हैदराबाद कडून खेळताना आक्रमक फलंदाजी केली होती. आता त्याला भारतीय संघात स्थान मिळालंय. अभिषेक शर्मानं तो ज्यावेळी शुन्यावर बाद झाला हे युवराज सिंगला कळलं त्यावेळी त्याची काय प्रतिक्रिया होती, याबाबत भाष्य केलं आहे. अभिषेक शर्मा म्हणाला की जेव्हा शुन्यावर बाद झालो हे समजलं त्यावेळी ते हसत होते. 




बीसीसीआयनं जारी केलेल्या व्हिडीओत अभिषेक शर्मानं युवराज सिंगसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. शनिवारी युवराज सिंग सोबत बातचीत केली होती. पदार्पणाच्या मॅचमध्ये शुन्यावर बाद झालोय हे सांगताच युवराज सिंग हसत होते. यावेळी युवराज सिंग म्हणाले की ही चांगली सुरुवात आहे. युवराज सिंग आता  माझ्या कामगिरीमुळं खुश असतील, ज्या प्रकारे घरच्यांना अभिमान वाटतो तसाच अभिमान त्यांना देखील वाटत असेल, असं अभिषेक शर्मा म्हणाला.  


अभिषेक शर्माच्या शतकानंतर युवराज सिंगनं अभिषेक शर्माच्या प्रशिक्षणाच्या काळातील व्हिडीओ पोस्ट केला आहे.   या व्हिडिओसह युवराज सिंगनं एक रुपक वापरलं आहे.रोमची उभारणी एका दिवसात झाली नाही, असं त्यांनी म्हटलंय. अभिषेक शर्माच्या टी 20 क्रिकेटमधील पहिल्या शतकापर्यंतच्या प्रवासासाठी अभिनंदन, असं युवराज सिंगनं म्हटलंय.यापुढं अशीच आणखी शतकं करशील, अशी आशा युवराज सिंगनं अभिषेक शर्माकडून व्यक्त केली आहे. 


अभिषेक शर्मा त्याच्या यशाचं श्रेय युवराज सिंगला देतो. युवराज सिंग मुळं यश मिळाल्याचं तो म्हणतो. दोन तीन वर्ष केवळ क्रिकेट नाही तर वैयक्तिक पातळीवर देखील युवराज सिंगनं मदत केल्याचं तो म्हणाला. अभिषेक शर्माच्या शतकावर युवराज सिंगनं अभिमान वाटत असल्याचं म्हटलं तर ही करिअरची शानदार सुरुवात असल्याचं म्हटलं. 


भारत झिम्बॉब्वे मालिका बरोबरीत


भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु आहे. भारतानं पहिल्या मॅचमधील पराभवानंतर कमबॅक केलं आहे. भारतानं दुसरी टी20 मॅच 100 धावांनी जिंकली. अभिषेक शर्मानं 46 बॉलमध्ये 100 धावा केल्या. 


संबंधित बातम्या :



Abhishek Sharma : पहिल्या मॅचमध्ये अपयश, लोकांनी संशय घेतला, अभिषेक शर्माच्या शतकानंतर वडिलांनी मन मोकळं केलं...