भारत आणि श्रीलंकामध्ये होऊ शकते फायनल, तर ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट, पाहा संपूर्ण समीकरण
ICC World Test Championship Final : भारत आणि श्रीलंका यांच्यात फायनलची लढत होण्याची शक्यता आहे.
ICC World Test Championship Final : कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (World Test Championship 2023) दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाने दोन सामने गमावल्यानंतर स्पर्धेतील त्यांचं आव्हान खडतर झाले आहे. अव्वल स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे या स्पर्धेतील आव्हान संपू शकते. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अद्याप कोणत्याही संघाचे स्थान पक्कं झालेलं नाही. ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंका यांचं आव्हान अद्याप कायम आहे. आघाडीचे दोन संघ फायनलमध्ये धडक मारु शकतात. ऑस्ट्रेलिायला दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये फायनल होण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण समीकरण जाणून घेऊयात..
काय आहे समीकरण -
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-0 च्या फराकरने पराभव झाला तर त्यांना श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेवर अवलंबून राहावं लागेल. ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने पराभव झाला अन् श्रीलंकेने न्यूझीलंडचा पराभव केला तर भारत आणि श्रीलंका यांच्यात फायनलचा थरार रंगू शकतो. ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने पराभव झाल्यास त्यांची विजयाची टक्केवारी 59.6 इतकी होईल. तर न्यूझीलंडविरोधात श्रीलंका दोन्ही सामने जिंकली तर त्यांची विजयाची टक्केवारी 61.11 इतकी होईल. अशा परिस्थितीत श्रीलंका संघ फायनलमध्ये पोहचू शकतो. पण ऑस्ट्रेलियाच्या टीमने एकही सामना ड्रॉ केला तर श्रीलंकेच्या विजयाचा किंवा पराभवाचा कोणताही परिणाम होणार नाही. भारताने ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने पराभव केला तर भारताची विजयाची टक्केवारी 67.43 इतकी होतेय. सात जून 2023 रोजी इंग्लंडमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल रंगणार आहे. यासाठी तीन संघामध्ये सध्या स्पर्धा सुरु आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाला फायनलला पोहचण्यासाठी एक सामना जिंकावा अथवा अनिर्णित ठेवावा लागणार आहे. तर श्रीलंकेला दोन्ही सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करावा लागणार आहे. यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अतिशय रोमांचक झाली आहे.
ICC WTC 2023 गुणतालिका -
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 66.67 टक्केंसह ऑस्ट्रे्लिया पहिल्या क्रमांकावर होता. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताची विजयाची टक्केवारी 64.06 इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 53.33 इतकी आहे. सध्या कसोटी अजिक्यंपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि भारत हे तिन्ही संघ स्पर्धेत आहेत. आता प्रत्येक सामना रंगतदार होणार आहे. भारतीय संघाने इंदूर कसोटीत विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण होणार आहे. तर भारत पहिल्या स्थानावर पोहचणार आहे.
आणखी वाचा :
कांगारुंना घरचा आहेर, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने पॅट कमिन्सला सुनावलं, म्हणाला....
कांगारुंचं नेमकं चाललंय तरी काय! कमिन्स, वॉर्नरनंतर आता आणखी एक खेळाडू ऑस्ट्रेलियाला गेला