World Cup 2023 : विश्वचषकाआधी टीम इंडिया भन्नाट फॉर्मात परतली आहे. आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. भारतीय संघ वनडेमध्ये अव्वल स्थानावर पोहचलाय. टीम इंडियाची कामगिरी सध्या भरारी घेणारी आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांनी मधली ओळमध्ये क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याशी चर्चा केली. सुनंदन लेले यांनी विविध विषयावर मत व्यक्त केले.. भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याची किती शक्यता? सूर्यकुमार यादवचा फॉर्म अन् बरेच काही... त्यांनी सांगितले. त्याशिवाय सुनंदन लेले यांनी विश्वचषकासाठी आपापला संघही निवडला...
भारताची चांगली डोकेदुखी -
भारतीय संघातील सर्वाच खेळाडू भन्नाट फॉर्मात आहेत. त्यामुळे बेंच स्ट्रेंथही आपली चांगली झाली आहे. शोधाशोध नाही... त्यापेक्षा कुणाला बाहेर ठेवायचं ही डोकेदुखी कधीही चांगली. प्रत्येक खेळाडू फॉर्मात असल्यामुळे ही चांगली डोकेदुखी आहे, असे म्हणायला हरकत नाही, असे लेले म्हणाले.
भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकतो, याची शक्यता किती?
भारतीय संघाने किमान उपांत्य फेरी गाठायला हवी. आपण एखादी परीक्षा दिली, तरी फर्स्ट क्लास मिळायलाच हवा. तसे क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर भारताने सेमीफायनल गाठायला हवी, ही भारताची पहिली परीक्षा होय. त्यानंतरचे दोन सामने (सेमी आणि फायनल) त्या दिवसाच्या खेळावर अवलंबून असतात...पण आताचा फील, परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयाची शक्यता जास्त आहेत.
भारतीय संघ प्रत्येक वेळा सेमीफायनल अथवा फायनलला जाऊन अडळखतो, हे मान्य आहे. पण आपण दुसरी बाजूही पाहयला हवी, भारतीय संघ सातत्याने सेमीफायनल-फायनल खेळत आहे. हेही सातत्य आहेच. यावेळीही भारतीय संघ २०११ प्रमाणे विजय मिळवेल, अशी मला अपेक्षा आहे, असे लेले म्हणाले.
वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला कधीच कमी लेखायल नको. आता दोन सामन्यात काय झाले.. हे महत्वाचे नाही. आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी पहिल्यापासूनच चांगली राहिली आहे. दुसरा संघ इंग्लंडचा असेल. इंग्लंडच्या संघाकडे अनुभव आहे, त्याशिवाय आक्रमक क्रिकेट ही त्यांची जमेची बाजू आहे. त्याशिवाय गतविजेते आहेत, हे विसरायला नको. न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघाच्या कामगिरीला विसरायला नको. यजमान भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे पाच संघ विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहेत, असे लेले म्हणाले.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत सध्याच्या संघात नवीन काय दिसतेय ?
सध्याच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. युवा खेळाडूंना २०११ पासून पाहतोय, तेव्हा विराट कोहली नवखा खेळाडू होता, त्याचा पहिलाच वर्ल्डकप होता. पण त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अजब आहे. आताचे उदाहरण घ्यायचे झाले तर इशान किशनचे घ्या.. आत्मविश्वास भरभरुन आहे. नवीन भारतीय पिढी कुणालाही घाबरत नाही. दुसऱ्या वनडेचं उदाहरण घ्या... श्रेयस अय्यरवर प्रश्नचिन्ह असतानाही तो भन्नाट खेळला.
खेळाडू घडवण्यात आयपीएलचा वाटा किती ?
आयपीएलला खूप लोक शिव्या घालतात...पैशासाठी खेळतात, यांना भारतासाठी खेळायचे नाही, कमर्शिअल झालेय... असे म्हणत आयपीएलला नावे ठेवले जाते. पण आयपीएलमुळे भारतीय संघाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलाय. जगातील अव्वल गोलंदाजाविरोधात आंतरराष्ट्रीय सामन्याआधीच खेळायला मिळाले. दिग्गजांबरोबर खेळल्यामुळे भारतीय युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलाय. जगातील दिग्गज खेळाडूंकडून भारताच्या युवा पिढीने आयपीएलमध्ये खूप काही शिकून घेतलेय. त्याचाच फायदा झालाय, हेही विसरता कामा नये.
भारताच्या मध्यक्रमाचे कोडे सुटले का ?
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे कोडे सुटले का?
सध्याच्या टीम इंडियाचे संतुलन पाहाता रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला येतील, यात शंकाच नाही. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळेल. पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला स्थान दिले जाऊ शकते. कारण, आघाडीच्या चार फलंदाजांनी ३१ षटकांपर्यंत चांगली फलंदाजी केली, तर सूर्यकुमार यादवसाठी २० षटकांचा खेळ राहतो... जेव्हा सूर्यकुमार यादवपुढे २० चा आकडा येतो... तेव्हा तो बदलतो. तो टी२० फलंदाज होऊन जातो. सूर्यकुमार यादव टी२० च्या झोनमध्ये गेला की प्रतिस्पर्धी संघासाठी तो खूप धोकादायक अन् भयंकर खेळाडू ठरतो. सहा क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि सातव्या क्रमांकावर रविंद्र जाडेजा.. असे टीमचे फॉर्मेशन दिसतेय.
आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा गोलंदाज खेळवायचा? याबाबत काय
मला असे काही वाटत नाही, जबाबदारी ज्याची त्याने घेतली पाहिजे... फलंदाज कमी पडतो म्हणून गोलंदाज कमी खेळवणं चुकीचे आहे. फलंदाजांनी जबाबदारी चोख बजावयला हवी.. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांचीही गरज भासली नाही पाहिजे.. आघाडीच्या पाच फलंदाजांनीच धावा करायला हव्यात, असे लेले म्हणाले.
महत्वाच्या सामन्यात मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह एकत्र खेळू शकतात, हे नाकारता येत नाही.
केएल राहुल भारताचा फर्स्ट चॉईस विकेटकीपर आहे. त्यामुळेच त्याला संधी दिली आहे. इशान किशन याला थोडे थांबावे लागेल. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी कुणाला घ्यायचे हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण राहुलबद्दल कोणताही प्रश्न नाही.
भारतीय संघासाठी धोका काय?
भारतासाठी केएल राहुल हा उत्तम फलंदाज आहे. पण विकेटकिपिंगच्या बाबतीत तो कमी पडणार आहे. कारण, तो ओरिजनल विकेटकीपर नाही. पण भारतीय संघाने हा धोका समजून उमजून घेतला आहे.
आपल्याकडे डावखुरा गोलंदाज अथवा फलंदाज नाही, ही थोडीफार कमकुवत बाजू असू शकते. पण याचा फारसा फरक नाही पडणार.
फिरकीचे संतुलन कसे --
कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा ही जोडी निश्चितच ११ मध्ये असेल.. अक्षर पटेल दुखापतग्रस्त झालाय.. तो फिट नाही झाला तर अश्विनला संधी दिली जाऊ शकते. अश्विन गोलंदाजी आणि फलंदाजीतही तगडा आहे. त्याशिवाय अनुभव मोठा आहे. त्यामुळे 28 तारखेपर्यंत संघात बदल होऊ शकतो, असे लेले म्हणाले.
Rahul Kulkarni मधली ओळ 382 : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कप जिंकेल ? मँचेस्टरवरून सुनंदन लेले लाईव्ह