India Vs West Indies 3rd ODI: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय. या दोन्ही सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) मोक्याच्या क्षणी अर्धशतक ठोकून भारताच्या विजयाच्या पाया रचला. दरम्यान, श्रेयस अय्यरला वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावता न आल्याची खंत आहे. परंतु, तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात तो नक्कीच शतक करेल, असा विश्वास त्यानं व्यक्त केलाय. 


श्रेयस अय्यर काय म्हणाला?
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी श्रेयस अय्यरच्या शॉर्ट बॉल्स खेळण्याच्या कमकुवतपणावर प्रश्न उपस्थित केले जात होते. या प्रश्नांना पूर्णविराम लावण्याचा श्रेयस अय्यर प्रयत्न करत आहे. "मी गेल्या काही काळापासून राहुल द्रविड आणि राठोर यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. तसेच शॉर्ट बॉलसाठी सरावही करतोय. विकेट आणि परिस्थिती बदलत राहते. तुम्हाला सामन्यासाठी परत यावं लागेल. जर तुम्ही तंदुरुस्त असाल तर तुम्ही तसे करण्यास सक्षम आहात", असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. 


शतक झळकावण्यासाठी उतरणार मैदानात
पुढे श्रेयस अय्यर म्हणाला की, "मी खूप भाग्यवान आहे की, वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावून संघासाठी योगदान दिलं. परंतु, मला अर्धशतकाचं रुपांतर शतकात करायचं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला फारशा संधी मिळत नाहीत. मला एक संधी मिळाली.  पुढील सामन्यात शतक झळकावण्याचा माझा प्रयत्न असेल."


श्रेयस अय्यरची एकदिवसीय कारकिर्द
एकदिवसीय क्रिकेटमधील श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड खास आहे. आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 26 डावात त्यानं 1 हजार 64 धावा केल्या आहेत. ज्यात 11 अर्धशतक आणि एक शतकाचा समावेश आहे. सध्या श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळत आहे. परंतु, विराट कोहलीचं संघात पुनरागमन झाल्यानंतर त्याला चौथ्या क्रमांकावर खेळावं लागेल.


हे देखील वाचा-